नाशिक : सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, लासलगाव बाजार समितीच्या प्रकरणाची चौकशी करून खोटे गुन्हे मागे घेतले जातील. शासन निर्णयानुसारच लिलावप्रक्रिया राबविणे व्यापाऱ्यांवर बंधनकारक असून व्यापारीवर्गाचे आडमुठे धोरण खपवून घेतले जाणार नाही, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
निफाड तालुक्यातील लासलगाव बाजार समितीच्या विषयासंदर्भात शेतकऱ्यांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. अहमदनगरसह इतर जिल्हयाच्या धर्तीवर नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया राबविली जावी, यासाठी लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार करून त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे व तत्काळ सर्व बाजार समित्यांमधील कामकाज सुरळीत करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.शेतकऱ्यांना आडतीतून मुक्त केल्याचा शासनाचा निर्णय व्यापाऱ्यांना मान्य नसल्यामुळेते लिलाव प्रक्रिया खोळंबून शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याने नानासाहेब पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)