नागपूर : जुलै महिन्यात सरकारी बँका तब्बल ११ दिवस बंद राहणार असून याचा ग्राहकांना फटका बसणार आहे. जुलैमध्ये पाच रविवार, दुसरा व चौथा शनिवार आणि ६ रोजी रमजान ईदमुळे बँकांना सुटी असेल तर युनियन आॅफ युनायटेड फोरम आॅफ बँकेने २९ जुलैला संप पुकारल्यामुळे या दिवशी सर्वच सरकारी बँकांचे कामकाज ठप्प राहणार आहे.याशिवाय भारतीय स्टेट बँकेच्या सहयोगी बँका, स्टेट बँक आॅफ बिकानेर व जयपूर, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ म्हैसूर, स्टेट बँक आॅफ पतियाला, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर या पाच सहयोगी बँका विलीन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयाविरोधात स्टेट बँक आॅफ बिकानेर व जयपूरच्या कर्मचाऱ्यांनी १२ आणि २८ जुलैला देशव्यापी संप पुकारला आहे. या दोन दिवसांत अन्य सरकारी बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार नाहीत, पण २९ जुलैला होणाऱ्या युनायटेड फोरमच्या संपात सर्व सरकारी बँकांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
जुलैमध्ये सरकारी बँका ११ दिवस बंद राहणार
By admin | Published: June 23, 2016 4:35 AM