कऱ्हाड (जि.सातारा) - ‘मी मंत्रिमंडळात नाही. सरकारपण आमचं नाही.हे सरकार शिवसेनेचं आहे,’ अशा वक्तव्याची काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ‘आॅडीओ क्लिप’ रविवारी दुपारी ‘व्हायरल’ झाली. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून एका कार्यकर्त्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीतरी करावे, अशी विनंती केली. त्यावेळी संबंधित कार्यकर्ता व माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात झालेल्या चर्चेची आॅडीओ क्लिप रविवारी ‘व्हायरल’ झाली.‘सध्याची परिस्थिती गंभीर आहे. याबाबत तुम्ही काहीतरी करावे. निर्णय घ्यावे,’ असे तो कार्यकर्ता माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना म्हणाला. तर त्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘सरकार आमचं नाही. शिवसेनेचं आहे,’ असे वक्तव्य केल्याचे त्या क्लिपद्वारे ऐकायला मिळत आहे. ‘मी फक्त शिफारस करू शकतो,’ असे ते कार्यकर्त्याला म्हणाले आहेत. यापुढे जाऊन भविष्यात तुम्हाला चांगली संधी मिळेल, असे त्याकार्यकर्त्याने म्हटल्यावर, सध्या तरी कोणीही संधी दिलेली नाही,असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाल्याचे त्या क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. मात्र, या आॅडिओ क्लिपमधील आवाजाची सत्यता पडताळून पहावी, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडमध्ये असून, त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कसलाही खुलासा अद्याप केला गेलेला नाही. त्यामुळे राज्यभर या क्लिपबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नये. राज्यातील सरकार महाआघाडीचे आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, काँग्रेसचा नाही. शिवसेना, राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकारचे नेतृत्त्व शिवसेना करत आहे. तीन पक्ष मिळून आम्ही एकत्र काम करतोय त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा विपर्यास करू नये.- शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री.
हे सरकार शिवसेनेचं, आमचं नाही; पृथ्वीराज चव्हाणांच्या 'ऑडिओ क्लिप'ने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 11:11 AM