मुंबई : वाढीव वीजदरानुसार राज्यातील सर्व लघुदाब, उच्चदाब वीजग्राहक, उपसा सिंचन योजनांस सप्टेंबरची बिले आली आहेत. राज्यातील यंत्रमागांसह सर्व लघुदाब आणि उच्चदाब उद्योगांच्या बिलातील वाढ किमान १० टक्के ते कमाल २०-२५ टक्क्यापर्यंत आहे. उपसा सिंचन योजनांच्या बिलातील वाढ १२ ते १५ टक्के आहे. बिले मिळाल्यानंतर वस्तुस्थिती कळल्याने उद्योजक आणि शेतकरी नाराज आहेत. सरकारने वीजग्राहकांचा विश्वासघात केल्याची टीका महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केली आहे.आॅगस्ट, २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भाजपाच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये दरवाढ होऊ देणार नाही, भारनियमन मुक्ती करू, वितरण गळती कमी करू, अशी आश्वासने देण्यात आली. ती पूर्ण केली नाहीत.वीज नियामक आयोगाने २० हजार ६५१ कोटी रुपये म्हणजे १५ टक्के दरवाढीस मान्यता दिली. त्यापैकी ६ टक्के म्हणजे ८ हजार २६८ कोटी रुपये रक्कम आताच्या प्रत्यक्ष दरवाढीतून वसूल केली जाईल. त्यापैकी काही दरवाढीचा भाग हा एप्रिल २०१९ पासून लागू होईल. म्हणजे सध्याची प्रत्यक्षात लागू झालेली दरवाढ जेमतेम ४ टक्के आहे. उरलेली ९ टक्के म्हणजे १२ हजार ३८२ कोटींची रक्कम नियामक मत्ता आकार म्हणून एप्रिल २०२० नंतर राज्यातील सर्व वीजग्राहकांकडून पुढील काही वर्षांत व्याजासह संपूर्णपणे वसूल केली जाईल. जेमतेम ४ टक्के वाढ झाल्यानंतर, बिले १५ ते २० टक्क्यांनी वाढली. परिणामी, १५ टक्के आकारणीचा हिशोब काय होईल, याची धास्ती ग्राहकांना आहे, अशी भीतीही होगाडे यांनी व्यक्त केली.
सरकारने वीजग्राहकांचा विश्वासघात केला- प्रताप होगाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 4:20 AM