- लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : राज्यामध्ये सध्या भोंदू लोकांचे सरकार सत्तेमध्ये आहे. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणताही कळवळा नाही. कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. केवळ भूलथापा देण्याचेच उद्योग हे सरकार करीत आहे. या सरकारवर कलम ४२0 नुसार गुन्हाच दाखल व्हायला हवा, अशी टीका करत राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी महाडमध्ये सरकारवर हल्लाबोल केला.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी राज्यात काढलेल्या संघर्ष यात्रेचा कोकणातील शेवटचा टप्पा बुधवारी महाड येथून सुरू झाला. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, आ. भाई जगताप, आ. जितेंद्र आव्हाड, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, आ. सुनील केदार, महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांच्यासह विरोधी पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकरी आत्महत्यांमध्ये ६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तुरीचा पैसा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. येत्या अधिवेशनासंदर्भात काय भूमिका घ्यायची याचा निर्णय १९ मे रोजी विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी राज्यामध्ये आघाडीचे सरकार असताना भात उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत दिली जात होती. युती सरकारने मात्र भात खरेदी केंद्रेच सुरू केलेली नसल्याचा आरोप केला. कोकणातील शेतीमालाला किमान आधारभूत किंमत, फळप्रकिया उद्योगाला चालना, मुंबई-गोवा महामार्ग रखडलेला आहेच आता त्याचे चौपदरीकरणाऐवजी सहा पदरीकरण, सागरी महामार्गाबाबत त्वरित पावले उचलली जावीत असे सांगितले.प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी या सरकारला शेतकऱ्यांच्या हिताशी काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप केला. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असेही ते म्हणाले.या पत्रकार परिषदेपूर्वी विरोधी पक्षाच्या सर्व मान्यवर नेत्यांनी किल्ले रायगडवर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. त्यानंतर चवदार तळे येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, त्यांनाही अभिवादन केले.उद्धव ठाकरे तेवढेच जबाबदार- विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सरकारविरोधात ४२० कलमाखाली गुन्हा दाखल व्हायला हवा अशी सडेतोड भूमिका मांडली.- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रोज आपली भूमिका बदलत असतात असे सांगून ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे राजकारणातील लखोबा लोखंडे आहेत.