अरण: आताच्या सरकारवर कोणाचा विश्वास नाही आणि सरकारचाही कोणावर विश्वास नाही. हे सरकार बिल्डर आणि इस्टेट वाल्यांचं सरकार आहे. ३३००० कुटुंबे देश सोडून गेली आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी केली.
माळी समाज सत्ता संपादन महामेळाव्यात अरण येथे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शंकरराव लिंगे होते. प्रारंभी आंबेडकर यांचा सत्कार महात्मा फुले यांची पगडी घालून आणि संत शिरोमणी सावता महाराजांचे खुरपे देऊन करण्यात आला. सभेला वंचित बहुजन आघाडीचे महासचिव शाहीर सचिन माळी, बाळापूरचे आमदार बळीराम शिरस्कर, सासवड माळी शुगरचे रंजनभाऊ गिरमे, गोपीचंद पडळकर, अॅड. अशोक ताजने, शिवानंद हैबतपुरे, आण्णाराव पाटील, महिला आघाडी अध्यक्षा किरणताई गिºहे, डॉ. अरुणा माळी, बाबासाहेब माळी, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, आनंद चंदनशिवे, बाळासाहेब माळी, पोपट माळी, सचिन गुलदगड उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना शंकरराव लिंगे यांनी माळी समाजाला विधानसभेत लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे, वंचित बहुजन आघाडीने त्या प्रमाणातच तिकिटे द्यावीत अशी आग्रही मागणी केली. प्रस्थापित माळी समाजाच्या नेत्यांनी आजपर्यंत माळी समाजासाठी कोणते ठोस कार्य केले नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहीर सचिन माळी यांनी केले. सभेसाठी सातारा, सोलापूर, पुणे, नांदेड , औरंगाबाद, अहमदनगर आदी भागातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अरण येथे आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शीतल साठे यांचा शाहिरी जलशाचा कार्यक्रम उपस्थितांची दाद मिळवून गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले.