नांदेड - शेतकऱ्यांशी आणि शेतीशी या सरकारचा काहीही संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रुमण्याचा हिसका दाखवावाच लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी जनतेला केले आहे. पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनानिमित्ताने आयोजित केलेल्या उमरी येथील सभेला संबोधित करताना ते बोलत होते.अजित पवार यांच्या भाषणाआधी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. मुंडे म्हणाले की, मुख्यमंत्री जरी शेतकरी असल्याचं म्हणत असले तरी ते कोणत्याही बाजूने शेतकरी दिसत नाहीत. धनंजय मुंडे यांच्या विधानाचा संदर्भ घेत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. या सरकारमधील लोकांना गाय, बैल, रेडकू यातला फरक कळत नाही. यांना शेतीतले काहीच समजत नाही, तेव्हा या सरकारला वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रुमण्याचा म्हणजे चाबकाचा हिसका दाखवावाच लागेल, असं अजित पवार म्हणाले आहेत.या सभेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री अनिल देशमुख, नांदेड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, माजी खा. गंगाधररावजी कुंटुरकर, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी महिला काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस सोनाली देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर आणि पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते.गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठवाड्यात हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी नांदेडमधील उमरी येथील सभेसाठी अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी फडणवीस सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अजित पवार म्हणाले, शेतीसाठीच्या पाणीपट्टीत वाढ भरमसाट वाढ करण्यात आली आहे, सरकारनं दिलेली कर्जमाफीची घोषणाही फसवीच निघाली. शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्यासह शेतीला लागणा-या साधन सामग्रीच्या किमतीत वाढ केल्याने शेतक-यांना जीव नकोसा झाला आहे. त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचं म्हणत फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सरकार म्हणजे बश्या बैल, यांना रुमण्याचा हिसका दाखवावाच लागेल- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 6:28 PM