लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : बळीराजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे, जय जवान जय किसान, शेतकरी वाचवा अशा विविध घोषणा देत आणि हायवे रस्त्यावर भाजीपाला फेकून व दूध ओतून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत शेतकरी संपाला पाठिंबा दिला. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावागावांतील शेतकरी रस्त्यावर उतरले होते.बहुळ, कोयाळी भानोबाची, चिंचोशी, वडगाव घेनंद, कडाचीवाडी, शेलगाव आदी गावांमधील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून शासनाचा घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला. बहुळ येथील शेतकऱ्यांनी चाकण-शिक्रापूर हायवे रस्त्यावर एकत्र येऊन शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतून दिले. तर कोयाळी, शेलगाव येथे भाजीपाला रस्त्यावर फेकून निषेध नोंदविण्यात आला.शासनाने अल्पभूधारक नव्हे तर सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतपिकांना तत्काळ हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, धैर्यशील पानसरे, जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई पानसरे, पंचायत समिती सदस्या वैशाली गव्हाणे, अध्यक्ष शरद मोहिते, खरेदी-विक्री संघाचे संचालक संतोष आवटे, अध्यक्ष अनिल साबळे, संचालक पंकजबापू हरगुडे, ऋषिकेश पवार आदींसह अन्य शेतकऱ्यांकडून केली जात आहे.>दूधवाटप करून शासनाचा निषेध एकीकडे दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे कडाचीवाडी (ता. खेड) येथील दूध उत्पादक शेतकरी बजरंग कड, माजी उपसरपंच बाळासाहेब कड ठाकरवाडी परिसरातील गरीब कुटुंबांना मोफत दूध वाटप करून शासनाचा निषेध करत आहेत. दूध रस्त्यावर ओतून देण्यापेक्षा ते गरिबांच्या मुखी लागावे म्हणून त्यांनी हा उपक्रम राबविला.शेतपिकांना योग्य बाजारभाव प्राप्त होत नसल्यामुळे शेतकरी व शेती अडचणीत आली आहे. कांद्यासारख्या प्रमुख पिकाला भाव मिळत नाही आणि त्यात भाजप सरकार शेतकरी उपयोगी निर्णय घेत नाही. परिणामी शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत. आता फक्त आश्वासने नकोत. -निर्मलाताई पानसरे, जिल्हा परिषद सदस्या.शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे सूतोवाच दिले आहेत. मात्र गेल्या दीड वर्षांपासून सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांना बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसह सगळेच शेतकरी अडचणीत आहेत. शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी.- सयाजीराजे मोहिते, संचालक,कृषी उत्पन्न बाजार समिती खेड.
सरकारचा धिक्कार! सरसकट कर्जमाफी हवीच!!
By admin | Published: June 05, 2017 12:58 AM