ऑनलाइन लोकमत
रावेर, दि. 9 - प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मतदारसंघातली काम खोळंबली आहेत. आगामी विधान परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका एकापाठोपाठ एक येणार असल्याने ती काम प्रलंबित राहतील. त्यामुळे आम्ही नाही तर सरकार जनतेत बदनाम होईल. लोक वैतागून आता म्हणू लागलीत की, तुमच्यापेक्षा काँग्रेसवाल्यांचं सरकार चांगले होते आणि त्यात मला तथ्यही वाटत असल्याचा खळबळजनक टोलाही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रशासनिक वरिष्ठ अधिका-यांशी भ्रमणध्वनीवरून बोलताना हाणला. रावेर येथील नवीन विश्रामगृहावर कार्यकर्तेंशी हितगुज साधताना आलेल्या कॉलवर ते बोलत होते.दरम्यान, त्यांना मंत्रिपदाच्या विस्थापनाबाबत पत्रकारांनी छेडले असता, त्यांनी जनमानसात थेट जाऊन हितगुज साधताना मिळणारा आनंद वेगळाच असून, मंत्रिपदावरील व्यस्ततेपेक्षा सुखावणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रावेर नगरपालिका निवडणूक संदर्भात त्यांनी धावता आढावा घेतला. अल्पसंख्याक बांधवासाठी २ कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी नमूद केले. नगरपालिका लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे नव्याने आरक्षण घोषित करण्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान ५० हेक्टर क्षेत्रात पीकपेरा असल्यावरच विमा कंपनी संरक्षित विमा देण्यास बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रावेर, पातोंडी, पुनखेडा रस्ता दुरुस्तीबाबत जि. प. शिक्षण सभापती सुरेश धनके यांनी त्यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी ठणकावून सांगितले की, तुमच्या आमदारांना सांगा ना हो. त्यांना पाठपुरावा करायला सांगाना, असा उपरोधिक टोला हाणत, त्यांचे परस्पर संबंधातील दुही त्यांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केली.