सरकारची कर्जमाफी फसवी, शेतक-यांमध्ये भेद निर्माण करणारी: राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 04:57 AM2017-09-09T04:57:44+5:302017-09-09T04:59:25+5:30
महाराष्ट्रातील सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असून, शेतक-यांमध्ये भेद निर्माण करणारी आहे. सरसकट कर्जमाफीसाठी आम्ही सरकारला भाग पाडू
परभणी : महाराष्ट्रातील सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असून, शेतक-यांमध्ये भेद निर्माण करणारी आहे. सरसकट कर्जमाफीसाठी आम्ही सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शेतक-यांना दिली.
पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय आणि शेतक-यांशी खा. गांधी यांनी आस्थेवाईक संवाद साधला.
या कार्यक्रमासाठी छोटेखानी मंच उभारला होता. सुरुवातीला १३ शेतक-यांनी खा. गांधी यांचा सत्कार केला. त्यानंतर एरंडेश्वर येथील शेतकरी बालासाहेब काळे यांनी शेतकºयांच्या अडचणी मांडण्यास सुरुवात केली. राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी फसवी आहे, कर्जमाफीच्या अर्जांसाठी अनेक अडचणी येत आहेत. दररोज नवा जी.आर. निघत असून, नवीन कर्ज मिळत नाही. जुन्या कर्जांची माफी होत नाही, या परिस्थितीमुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत, असे सांगितले.
शेतकरी आपल्या समस्या मांडत असतानाच खा. गांधी अचानक मंचावरून उठले, सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेल्या लाकडी कठड्यामधून थेट समस्या मांडणाºया शेतकºयांमध्ये येऊन मांडी घालून बसले. त्यानंतर शेतकºयांचा उत्साह आणखीच वाढला. एक-एक करीत शेतकरी गाºहाणे मांडत होते. प्रा. व्यंकटराव काळे, अण्णासाहेब काळे, राजू काळे आदींनी राज्य शासनाकडून अडवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी खा. राहुल गांधी यांनी शेतकºयांना अनेक प्रश्न विचारले. त्यात तातडीचे १० हजार रुपये मिळाले का, गावाची लोकसंख्या किती आहे आणि किती जणांना कर्जमाफी झाली, असे प्रश्न करताच गावक-यांनी एकालाही कर्जमाफी मिळाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर खा. राहुल गांधी यांनी राज्य सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफी देण्यास शासनाला भाग पाडू, असे अभिवचन दिले. शेतक-यांशी संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या.