मुंबई – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात परिस्थितीत दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज ९ वा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांनी केली. त्यानंतर आज सरकारकडून ३ मंत्र्यांचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेऊन आरक्षणाबाबत प्रक्रिया आणि सरकार करत असलेले प्रयत्न याबाबत चर्चा करणार आहेत.
सरकारकडून मंत्री उदय सामंत, अतुल सावे आणि धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिष्टमंडळात सरकारमधील तिन्ही पक्षाच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून उदय सामंत, अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे आणि भाजपाकडून अतुल सावे यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढणार आहेत.
जरांगे पाटील यांची भेट घेण्यापूर्वी या तिन्ही मंत्र्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी चर्चा केली. धनंजय मुंडे, अतुल सावे हे मराठवाड्यातील आहे. तर उदय सामंत कोकणातले आहेत. या तीन मंत्र्यांसोबतच संदिपान भुमरे आणि आमदार नारायण कुचे यांचाही शिष्टमंडळात समावेश आहे. काल सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावी अशी विनंती सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली आहे.
मंत्रालयात सर्वपक्षीय आमदारांचे आंदोलन
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता मुंबईत आमदारांनीही आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी मराठा समाजातील आमदारांनी मंत्रालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा मंत्रालय परिसरात आमदारांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी या आमदारांना ताब्यात घेतले. याठिकाणी आमदार रोहित पवार म्हणाले की, सत्ताधारी-विरोधी आमदार मराठा समाजाला न्याय मिळावा, जरांगे पाटील यांच्या काळजीपोटी सर्वच आंदोलन करतायेत. प्रत्येकजण आपापल्या परीने आंदोलन करत आहेत. सत्ताधारी आमदार आंदोलन करत आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहे. परंतु ते प्रयत्न करत आहेत. सरकारने लवकरात लवकर शिष्टमंडळ पाठवून मनोज जरांगेंशी चर्चा करावी. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. त्यामुळे ते उपोषण मागे घेतील यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी रोहित पवार यांनी केली.