ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 3 - देशातील एका अग्रणी नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने १२ वे स्थान पटकाविले आहे. विशेष म्हणजे पहिल्या १५ महाविद्यालयांमध्ये राज्यातील केवळ तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.
या नियतकालिकेतर्फे दरवर्षी देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांची यादी जाहीर होते. यंदा म्हणजे २०१६-१७ मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये दंत महाविद्यालय व रुग्णालयातील उपलब्ध सोयी-सुविधा, महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा, शिक्षक-विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शैक्षणिक पेपर प्रेझेन्टेशन, दंत परिषदांमधील शिक्षकांचा सहभाग, रुग्णांसाठीच्या सेवा-सुविधा व अद्ययावत उपकरणेआदी निकषांच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात येते.
यंदाच्या सर्वेक्षणानुसार मणिपालच्या "मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस" या खासगी महाविद्यालयाने ५६३ गुणांच्या आधारे देशातून पहिले स्थान पटकाविले.
यापूर्वीच्या सर्वेक्षणामध्ये शहरातील शासकीय दंत महाविद्यालयाने १३ स्थान पटकाविले होते. यंदा १२ वे स्थान मिळविले. सर्वेक्षणातील १५ महाविद्यालयांच्या यादीमध्ये मुंबईतील दोन महाविद्यालयानंतर केवळ औरंगाबादतील महाविद्यालयाचा समावेश असल्याचेही समोर आले आहे.