- विठ्ठल भिसेपाथरी (जि़ परभणी) : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबा यांची जन्मभूमी पाथरीच असल्याचे २९ पुरावे समोर आल्यानंतर आता १९६७ मधील परभणी जिल्ह्याचे राज्य शासनाचे इंग्रजी गॅझेट व पाथरी नगरपालिकेच्या मालमत्ता नोंदणी वहीतही श्री सार्इंची जन्मभूमी पाथरीच असल्याचे दस्तावेज समोर आले आहेत़पाथरी येथील श्री साई जन्मभूमी विकास कृती समितीचे अध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी काही शासकीय दस्ताऐवज जाहीर केले आहेत़ त्यानुसार १९६७ मध्ये राज्य शासनाने परभणी जिल्ह्याचे पहिलेच इंग्रजीमध्ये गॅझेट प्रसिद्ध केले़ या गॅझेटमध्ये देखील श्री साईबाबा यांचे जन्मस्थळ पाथरी असल्याची नोंद आहे़ त्यामध्ये श्री साई बाबा यांचा जन्म पाथरीतील भुसारी कुटुंबात झाला असून, ते पाथरीतून सेलूला गेले़ तेथे त्यांनी सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांना आपले गुरु मानले़ सेलूत केशवराज बाबासाहेब महाराज यांचे मंदिर असून, त्यांचा काळ १७१५ ते १८०९ असा आहे, अशी गॅझेटमध्ये नोंद आहे. याशिवाय शिर्डी येथील संस्थानचे एकेकाळचे विश्वस्त विश्वास खेर यांनी १९७५ मध्ये श्री सार्इंचा पाथरी येथे जन्म झाल्याचे संशोधन केले़ त्यानंतर पाथरी नगरपालिकेने १९७७-७८ ते १९८०-८१ मध्ये श्री साई बाबा यांचे वंशज अण्णासाहेब भुसारी यांच्या नावे असलेल्या घराचे श्री साई स्मारक समिती असे जावक क्रमांक ११५१/८०दि़२२ जानेवारी १९८० अन्वये नामांतर केले असल्याची नोंद आहे़ त्यावेळेसपासून ही नोंद कायम आहे़ नगरपालिकेच्या कागदपत्रांमध्येही पाथरीच श्री सार्इंचे जन्मस्थळ असल्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे़ त्यामुळे पाथरीकरांच्या दाव्याला बळ मिळाले आहे़शिर्डीकरांनी मोठेपणा दाखवावा - दुर्राणीपाथरी येथील श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळास शिर्डी येथील विश्वस्त व नागरिकांनी केलेल्या विरोधाचे मूळ हे तेथील अर्थकारणच असल्याचे दुर्राणी यांनी सांगितले़ साई चरणी कोट्यवधी भाविक मनोभावे विविध माध्यमातून देणगी देतात़त्या अनुषंगाने २०१४-१५ ते २०१८-१९ या पाच वर्षांच्या कालावधीत श्री साई संस्थानचे २ हजार ६३५ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न होते़ त्यामधील १ हजार ६९३ कोटी २० लाख रुपये संस्थानने खर्च केला़ उर्वरित ९४२ कोटी ७ लाख रुपये संस्थानने बँक डिपॉझिट केले़ या अर्थकारणाला फटका बसण्याची भीती शिर्डीकरांना वाटते़ म्हणूनच ते सत्य नाकारून पाथरीला विरोध करीत आहेत, असे दुर्राणी यांनी सांगितले. शिर्डीकरांनी पाथरीला विरोध न करता मोठ्या मनाने या जन्मस्थळाचा विकास होण्यासाठी उदार भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले़
शासकीय दस्तऐवजातही पाथरीच साईबाबांची जन्मभूमी असल्याची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 6:03 AM