ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 30 - भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले वादग्रस्त विधान ताजे असतानाच आता भाजपाच्या आणखी एका नेत्याने वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या या संपाचा काही फरक पडणार नसल्याचे मत भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले आहे. ते आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी एका कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान केले आहे. कोणत्याही शेतकऱ्यांना संप करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. संपामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी संप केला तर सरकारला काहीही फरक पडणार नाही, अशी मुक्ताफळे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी (मंगळवार) उधळली. खासगी कामाच्या निमित्ताने भंडारी आज पंढरपुरात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शेतकऱ्यांविषयी ही भाषा वापरली. तसेच शेतकऱ्यांच्या संपामुळे अन्नधान्य कमी पडले तर आयात करू किंवा पर्यायी व्यवस्था निर्माण करू, असेही वक्तव्य केले.भंडारी म्हणाले, विरोधी पक्षांनी यापूर्वी संघर्ष यात्रा काढली होती. त्यांच्या संघर्ष यात्रेला किती शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर आमदार बच्चू कडूंनीही सरकारच्या विरोधात आसूड यात्रा काढली. आता खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्लेष यात्रा सुरू आहे. अशा यात्रांमुळे सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. अशा यात्रा काढून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. खासदार शेट्टींचे काय दुखणे आहे, हे अजून तरी आम्हाला कळाले नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची अनेक कामे केली. तूर, हरभरा, ऊस यासारख्या नगदी पिकांना हमीभाव मिळवून दिला. दुधाला भाव वाढवून दिला. शेती उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होते, त्या वेळी भाव पडतात हे त्रिकाल सत्य आहे. तरीही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा म्हणून सरकारने 40 टक्के तुरीची हमीभावाने खरेदी केली. यापूर्वी कोणत्याही सरकारने ती केली नाही. तूर विक्रीमध्ये काही व्यापारी आणि दलालांनी घोटाळे केले आहेत. अशा लोकांची चौकशी करून कारवाई करण्याचे काम सुरू आहे, असे भंडारी यांनी सांगितले.
दरम्यान, शेतकऱ्यांना संपावर जाण्याची चिथावणी देऊन काय साध्य होणार ?असा प्रश्न आपण उपस्थित केला होता. मात्र माझ्या या वक्तव्याता विपर्यास करण्यात आला असल्याचे मत माधव भंडारी यांनी व्यक्त केले आहे.