नागपूर : महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटर्नल सिक्युरिटी हा नवा कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. या कायद्याद्वारे सामान्य माणसाचा जगण्याचा हक्क हिरावण्याचा बेत आहे. लोकशाही असलेल्या देशात सरकार विरोधकांचाच नव्हे, तर सामान्य माणसांचाही आवाज दाबण्याच्या प्रयत्नात आणीबाणी लागू करीत आहे, असा घणाघाती आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी केला. कायद्यातील अटी सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणाऱ्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. यातील तरतुदींनुसार मोर्चा काढण्यासाठी, एखाद्या समारंभासाठी १००पेक्षा जास्त लोक एकत्र येत असल्यास पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. पोलिसांना कायदेभंगाचा संशय आला तर थेट तुरुंगात टाकण्याचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. या कायद्यामुळे पोलिसांना अमर्याद अधिकार मिळतील व यातून भ्रष्टाचार फोफावेल, असा धोका वडेट्टीवार यांनी वर्तविला. (प्रतिनिधी)
राज्यात आणीबाणी लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न-वडेट्टीवार
By admin | Published: August 27, 2016 4:39 AM