पुणे : पाच वर्षांपूर्वी सनातन संस्थेवर बंदी आणावी असा प्रस्ताव मी अभ्यास करून केंद्राला पाठवला होता. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न होता कर्नाटक आणि महाराष्ट्रात या संस्थेला राजाश्रय मिळत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुण्यात केला आहे.
पुण्यात काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्याची प्रक्रिया असते. मात्र सनातनसाठीच्या प्रक्रियेला विलंब झाला असून यात कोणती तरी फार मोठी गुप्तचर संघटना यात दिसत असल्याची शंका आहे. सनातनला मिळत असलेला राजाश्रय देशाला घातक आहे. डॉ दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, गौरी लँकेशा यांच्या हत्येनंतर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. यात सरकारने विनाहस्तक्षेप तपास करावा अशी मागणीही त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी हल्लाबोल यात्रा काढली होती. त्याचेच अनुकरण काँग्रेस करत आहे का यावर त्यांनी आमची यात्रा स्वतंत्र आहे. त्यांना ती वेळ सोयीची होती, आम्हाला ही आहे अशा शब्दात अधिक भाष्य करणे टाळले. अजून आघाडीचा कोणतंही निर्णय झाला नसून लोकसभेच्या ४८ जागा आम्ही लढू असेही ते म्हणाले. निवडणुकीत होणाऱ्या इव्हीएम पद्धतीवरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीत आयोगाकडे मागणी करणार इव्हीएम नको ही आमचीच नाही तर सर्वच राजकीय पक्षांची तशी मागणी आहे.