सरकार हम से डरती है,पोलीस को आगे करती है.. : 'साहेब आणि दादां' वरील कारवाईचे बारामतीत तीव्र पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 12:13 PM2019-09-25T12:13:00+5:302019-09-25T12:30:16+5:30
संतप्त बारामतीकर भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देत मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते...
बारामती : राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बारामतीत त्याचे तीव्र पडसाद उमटले. बुधवारी(दि २५) बारामतीकरांनी कडकडीत बंद पाळत शासनाचा निषेध केला.यावेळी हजारो नागरिकांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.सरकार हम से डरती है,पोलीस को आगे करती है या घोषणांनी बारामती दुमदुमली.
संतप्त बारामतीकर भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देत मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते.यावेळी शहरातील भिगवण चौक येथे झालेल्या गर्दीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांची ,महिलांची संख्या मोठी होती. सकाळपासुनच मोठ्या संख्येने नागरीक ,कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली .यावेळी पोलीस , आरपीएफ जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर,पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.मात्र, पोलीस अधिकाºयांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरुच होती. शासनाच्या निषेधासह शरद पवार जिंदाबाद तसेच अजित पवार जिंदाबाद च्या जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. सरकार हम से डरती है,पोलीस को आगे करती है या घोषणांनी बारामती दुमदुमली.पोलिसांनी घोषणा देऊ नका, शांततेत आंदोलन करा,वाहतुकीला अडथळा न करता रस्त्यावर गर्दी न करण्याचे आवाहन केले. मात्र राष्ट्रवादी चे कार्यकर्ते भिगवण चौकात मांडी घालून बसले.त्यानंतर पुन्हा भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू होती.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी भाजप सरकारने केलेली कारवाई खुनशी वृत्तीने केली आहे.मात्र, बारामतीकरांनी संयम बाळगावा, कारवाईचा निषेध करुन शांततेत घरी परतण्याचे आवाहन केले.यावेळी शहरासह तालुक्यातुन मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे खळबळ उडाली आहे .' आय सपोर्ट साहेब , दादा ' अशा शब्दात बारामतीकरांनी सोशल मिडीयावर दोन्ही नेत्यांना पाठिंबा देण्याची मोहिम उभारली आहे.
————————————————
...शाळांसह वैद्यकीय सेवा देखील बंद
बारामती शहरातील व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पळाला.शिवाय अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली. अनेक विद्यार्थी,शिक्षक आज सकाळी शाळेत आल्यानंतर शालेय व्यवस्थापनाने सुट्टी जाहिर केली.शहरातील दवाखाने,हॉस्पिटल मध्ये केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरु ठेवण्यात आली होती.केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरु ठेवत विविध डॉक्टर संघटनांनी देखील निषेध व्यक्त केला.
—————————————————