मुंबई : सार्वजनिक आरोग्य केंद्रांमधील विशेषज्ञ डॉक्टरांची ७० टक्के रिक्त पदे येत्या तीन महिन्यात भरण्यात येतील, एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत कर्ज घेऊन आणि १३०० कोटी रुपये खर्चून आरोग्य केंद्रांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील आणि राज्यातील ५० टक्के रुग्णवाहिका बदलण्यात येतील, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.प्रश्नोत्तराच्या तासात आरोग्य विभागाशी संबंधित चार प्रश्नांवर चर्चा झाली. अमिन पटेल, शेखर निकम, राणा जगजीतसिंह पाटील आणि विकास ठाकरे यांनी हे प्रश्न उपस्थित केले. महाड, जि.रायगड येथील ट्रॉमा केअर सेंटरसाठी भूलतज्ज्ञांची नेमणूक तत्काळ केली जाईल हे सांगतानाच गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी गरज नसताना ट्रॉमा केअर सेंटर देण्यात आल्याचे स्पष्ट करून टोपे म्हणाले की आता प्राधान्यक्रम ठरवून हे सेंटर पूर्ण केले जातील आणि तिथे कर्मचारीवर्गही दिला जाईल.राज्याचे आरोग्य सुधारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून ४ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचे प्रस्तावित आहे. त्यातून ज्या आरोग्य केंद्रांच्या इमारती ७५ टक्के पूर्ण झाले आहे ते आधी पूर्ण केले जाईल. पूर्व विदर्भातील आरोग्य केंद्रांमध्ये विशेषज्ञांची ९१३ पदे रिक्तअसून त्यातील ५७४ पदे येत्या तीन महिन्यात भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.धुळे महिला रुग्णालयाला निधी देणारधुळे शहरातील जुने जिल्हा रुग्णालयाला आवारात १०० खाटांच्या महिला रुग्णालयास मंजुरी देण्यात आली आहे. या अधिवेशनामध्ये रुग्णालयासाठी निधीची तरतुद केली जाईल आणि यावर्षी रुग्णालयाचे काम पूर्ण होईल. यासाठी प्रयत्न केले जातील, असे टोपे यांनी सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरढोण ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
आरोग्य खात्यातील डॉक्टरांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 3:43 AM