मुंबई : महिला दिनी राज्य सरकारने राज्यातील महिलांना गुड न्यूज दिली. महिलांना सक्षम बनवणारे राज्याचे चौथे महिला धोरण शुक्रवारी महिला दिनी लागू करण्यात आले.
जागतिक महिला दिनी राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर झाले आहे. महिलांना समान संधींसोबतच रोजगारात प्राधान्य, कामकाजी महिलांना गर्भवती असतानाच्या काळात विविध सुविधा अशा विविध उपाययोजना त्यात करण्यात आल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
काय आहे महिला धोरणात?- दुर्गम भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिरी घेणे.- महिलांची संख्या जास्त असलेल्या कामाच्या ठिकाणी मागणीनुसार पाळणाघर उपलब्ध करणे,- मुलींची शाळांमधील नोंदणी १०० टक्के होईल व त्यात सातत्य टिकून राहील याची दक्षता घेणे.- सार्वजनिक व खाजगी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधासाठी समिती स्थापन करणे.- सर्व पोलीस मुख्यालयात भरोसा कक्ष स्थापन करणे.- महिलांना वापरण्यास अनुकूल कृषी यंत्रणे तयार करण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देणे.- असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या आणि ऊसतोड महिलांसाठी वसतीगृहे स्थापण्याचा विचार.- नोकरी करणाऱ्या महिलांसाठी जिल्हा पातळीवर वसतीगृहे. निवडून आलेल्या महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम.
कार्यक्रम का नाही?एवढ्या मोठ्या धोरणाच्या अधिकृत घोषणेचा कार्यक्रमच झाला नाही. या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत महिला धोरण जाहीर करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धोरणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्याचे विभागाने ठरवले होते. मात्र ही बैठक होऊ शकली नाही. महिला दिन निघून गेल्यानंतर हे धोरण जाहीर करणे उचित ठरले नसते. त्यामुळे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही हे धोरण लागू केल्याचे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.