माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याचं ऐकलंय; मलिक यांच्या ट्विटनं चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 07:41 AM2021-12-11T07:41:41+5:302021-12-11T07:43:36+5:30
सरकारी पाहुण्यांच्या स्वागताला तयार; मंत्री नवाब मलिक यांचं ट्विट
मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर टीका केल्याप्रकरणी हायकोर्टाची माफी मागणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. माझ्या घरी आज उद्या सरकारी पाहुणे येणार असल्याचं कळतंय. त्यांचं स्वागत आहे, असं मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल रात्री एक ट्विट केलं. 'मित्रांनो, माझ्या घरी आज उद्या सरकारी पाहुणे येणार असल्याचं ऐकलंय. आम्ही त्यांचं स्वागत करतो. घाबरणं म्हणजे रोज रोज मरणं. आम्ही घाबरणार नाही. लढणार आहोत. गांधी गोऱ्यांशी लढले होते. आम्ही चोरांशी लढणार आहोत,' असं मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 10, 2021
डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है,
गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से.
नवाब मलिक यांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मलिक यांच्या केंद्रीय तपास यंत्रणा धाडी टाकणार आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरावर, कार्यालयांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. त्यावेळी शरद पवारांना विचारलं असता, सरकारी पाहुणे येऊन गेले. त्यांची भीती वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता मलिक यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सरकारी पाहुण्यांचा उल्लेख केल्यानं चर्चा रंगू लागल्या आहेत.