नागपूर - भाजपाचे आमदार आशिष देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून आपल्याच सरकारच्या धोरणांवर जाहीरपणे टीका करीत आहेत. केंद्रात सत्ता आल्यास विदर्भाचे स्वतंत्र राज्य होईल, असे आश्वासन भाजपा नेत्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. गेल्या साडेतीन वर्षापासून केंद्रात सत्ता असूनही विदर्भाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. भाजपा नेत्यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. दुसरीकडे राज्य सरकारवर तब्बल ४.५० लाख कोटींचे कर्ज आहे. राज्याची आर्थिक स्थिती विचारात घेता संयुक्त महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही. नव्याने निर्माण झालेले उत्तराखंड राज्य प्रगतीच्या बाबतीत देशात सर्वात पुढे आहे. याचा विचार करता स्वतंत्र राज्य झाल्यास विदर्भाचा विकास होईल. आजवर विदर्भासाठी राखून ठेवण्यात आलेला निधी पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी वळविण्यात आला. यामुळे विदर्भ मागास राहिला. परिणामी विदर्भ शेतकरी आत्महत्यात सर्वात पुढे असल्याचे आशिष देशमुख म्हणाले.
विदर्भातील सिंचनाचा अनुशेष, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी , उद्योगांचा अभाव, वीज भारनियमन,कुपोषण व नक्षलवाद अशा समस्या मार्गी लागव्यात, तसेच विदर्भाचा सर्वांगीण विकास हवा असेल तर स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच जनतेची मते जाणून घेण्यासाठी ७ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढणार असल्याचे भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
जनमंचच्यावतीने आमदार निवास येथे दुसरे राज्यस्तरीय किसानपुत्र आंदोलन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भाजपाचे आमदार आशिष देशमुख आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, शेतकरी विरोधी कायदे बदलण्याची नितांत गरज आहे. गोवंश बंदी कायदासुद्धा तसाच आहे. गोवंश हा भावनेशी जुळला असल्याने किमान बैलाला तरी त्यातून सूट देण्यात यावी, यासंबंधात शासनाने फेरविचार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच ते म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना ग्रामीण भागात चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे येत्या १ फेब्रुवारी रोजी होणारे देशाचे बजेट हे कृषीवर आधारित राहण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना पेन्शन योजना जाहीर करण्याचे आश्वासन देण्यात आलेले होते. ते झाले तर शेतकऱ्यांना मोठी मदत होईल. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करण्याचे आणि ५० टक्के नफा मिळून हमी भाव देण्याचे आश्वासन सुद्धा भाजपाने दिले असल्याची आठवण करून देत सरकारने दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्यांना बाध्य करावे लागेल, असेही ते म्हणाले. शेवटी त्यांनी तेलंगणा या राज्याचे उदाहरण देत स्वतंत्र राज्य कसा विकास करू शकते हे सांगत विदर्भ हे देशाचे ३० वे राज्य निर्माण होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
म्हणून जशास तसे उत्तर !भाजपाची छोट्या राज्याची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठविला तर स्वतंत्र विदर्भाची घोषणा होऊ शकते. विदर्भ राज्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. परंतु यावर कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे मला अधिवेशन कालावधीत २० डिसेंबरला नोटीस मिळाली होती. यावर ३० डिसेंबरपर्यंत उत्तर द्यावयाचे होते. परंतु मला माझ्या पत्राचे उत्तर न मिळाल्याने मीही नोटीसला उत्तर दिले नाही, अशी भूमिका आशिष देशमुख यांनी यावेळी मांडली.
कोण आहेत आशिष देशमुख?आशिष देशमुख हे नागपूरमधील काटोल मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. उच्चशिक्षित असलेल्या आशिष देशमुखांनी ’ग्रामविकासाचा पासवर्ड’ पुस्तकही लिहिले आहे.