मुंबई: आरक्षण देणं आमच्या हातात नाही, असं म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन हात वर केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारच दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितलं होतं. मात्र आता चंद्रकांत पाटील यांनी आरक्षण देणं आमच्या हातात नसल्याचं म्हटलं आहे.'आरक्षण देणं आमच्या हातात नाही. फी देणं किंवा योजना करणं आमच्या हातात आहे. ते आम्ही केलं. मात्र आरक्षणाबद्दल मागास आयोगाच्या अहवालावर सर्व अवलंबून आहे,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 'आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हाती नाही. मागास आयोगानं त्यांच्या पाहणीतून निष्कर्ष काढले आहेत. तो अहवाल स्वीकारणं सरकारचं काम आहे. मागास आयोगाचा अहवाल लवकर येणंही सरकारच्या हातात नाही. कारण तो आयोग स्वायत्त आहे,' असं पाटील यांनी सांगितलं. 'आम्ही आयोगाला आवश्यक सामुग्री आणि मदत देत आहोत. परंतु घटनेच्या बाहेर जाऊन आम्ही काहीही करु शकत नाही,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाबद्दल सरकारनं दिलेलं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयानं नाकारलं आहे. त्यामुळे मागास आयोगानं तयार केलेला अहवालच न्यायालयात सादर केला जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.
मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हातात नाही- चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 8:00 PM