ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १५ : बुधवारी राज्यभरातील शासकीय परिचारीकांनी त्यांच्या मागण्यासाठी पुकारलेल्या संपामुळे शहरातील शासकीय आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचे चित्र होते. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने पुकारलेल्या या संपामुळे पुण्यातील ससून शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या शस्त्रक्रिया खोळंबल्या होत्या.
शहरातील एक ते दिड हजार परिचारीका या संपात सहभागी झाल्या होत्या. या परिचारीकांनी ससून रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांची भेट घेतली. यावेळी मुठे यांनी परिचारीकांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू असे आश्वासन परिचारीकांना दिले. यामध्ये पुण्यातील येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालय, चिंचवड येथील राज्य कामगार विमा रुग्णालय, पुणे जिल्हा सामान्य रुग्णालय, उरो रुग्णालय व ससून रुग्णालय या पाच रुग्णालयांतील परिचारीकांचा समावेश होता.
हा संप राज्यव्यापी असल्याने राज्यातील एकूण २२ हजार परिचारीकांनी या संपात सहभाग घेतल्याचे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले यांनी सांगितले. परिचारीकांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने हा संप पुकारण्याची वेळ आली असल्याचेही त्या म्हणाल्या.
याविषयी ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरे यांना विचारले असता ते म्हणाले, संपाची आधीपासून माहीती असल्याने आयुक्तांशी आधीच बोलणी केलेली होती. त्यानूसार महापालिकेच्या दवाखान्यांतील ५० परिचारीका महापालिकेने ससूनमधील सेवेसाठी एक दिवसासाठी पाठविल्या होत्या. तसेच ससून रुग्णालयातक असणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयातील शिक्षकांचीही मदत घेण्यात आली. याबरोबरच निवासी डॉक्टर व महाविद्यालयातील अधिव्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक यांचीही वैद्यकीय कामांसाठी मदत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नर्सिंग शिक्षकांनाही परीक्षांमुळे जास्त वेळ काम करणे शक्य नसल्याचे त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
यावेळी परिचारिकांनी अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले. परिचारिकांसाठी आखलेल्या मार्गदर्शक तत्वांना फाटा देऊन शासन नर्सेसच्या सातत्याने विनाकारण बदल्या करत आहेत. याशिवाय बंधप्रत्रित परिक्षेचा प्रश्न गुंतागुंतीचा करुन ठेवला आहे, ती परिक्षा रद्द करावी. परिचारिका या रुग्णसेवेसाठी असतात, त्यांना आॅफिसची कारकूनी कामे देऊ नयेत.
शासनाने दिलेल्या आदेशानुसार परिचारिकांच्या सर्व स्तरातील रिक्त पदे भरणे, सुरक्षिततेसाठी स्वतंत्र संचालक प्रात्याक्षिकाला महत्व देणारे शिक्षण यासह अनेक प्रलंबित मागण्या़साठी परिचारिका संप पुकारला असल्याचे फाऊंडेशनच्या खजिनदार सुमन टिळेकर यांनी सांगीतले. याविरोधात २०१४ आणि २०१५ मध्येही फेडरेशनच्या नर्सेसनी संप केला.१५ जून सकाळी ७.३० पासून सुरु होणार असून १६ जून २०१६ ला सकाळी ७.३० पर्यंत चालू राहणार आहे. दररोज ससूनमध्ये ४० तातडीच्या शस्त्रक्रिया केल्या जातात आज संपामुळे केवळ १२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. इतर शस्त्रक्रिया काही दिवस पुढे ढकलण्यात आल्याचेही डॉ. तावरे म्हणाले. याबरोबरच १० प्रसूती व १० लहान शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापरिणाम रुग्णालयांतील एमआरआय, सीटीस्कॅन , एक्स-रे यांसारख्या तपासण्यांवरही झाला.या संपाचा रुग्णांवर परिणाम होऊ नये म्हणून ससून रुग्णालयातील अधिकारी मर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना काम करण्यास सांगत होते. मात्र या विद्यार्थिनींची २१ जून पासून वार्षिक परीक्षा असल्याने त्यांना हे काम करणे शक्य नव्हते. यावेळी काम केल्यास हॉलतिकीट लवकर मिळेल, तुमची उपस्थिती कमी असल्याने तुम्हाला काम करावे लागेल असा दबाव आणला जात असल्याचे नर्सिंगच्या काही विद्यार्थिनींनी सांगितले.