विठ्ठल खेळगी
सोलापूर : ईडीचा वापर करून विरोधी पक्ष संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही. मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, असा दावा शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी केला. रविवारी सांगोला येथे शिवसेनेची सभा झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले, केंद्र सरकारकडून ज्या पद्धतीने विरोधी पक्षांना नामशेष करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग केला जातोय, अशा प्रकारची धरपकड कधीही झाली नाही. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीपेक्षाही हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यासाठी ईडीचा पुरेपूर वापर केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या पुढच्या निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादी सोबत लढण्याचे आज तरी ठरले नाही, परंतु आजतरी महाविकास आघाडी एकत्र आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जो काय निर्णय घ्यायचा असेल तो तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेतील. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत अशाच पद्धतीने निर्णय होईल. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढे ते मोठे नाहीत. शिवसैनिकच त्यांना त्यांची जागा दाखवतील, त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही खासदार विनायक राऊत यांनी केली.
नॉट ओके...शिवसेना विल बी ओके
शहाजीबापूसारखा नौटंकी करणारा माणूस राजकारणात विनोद करू शकतो पण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही हे तिथल्या मतदारांनी ठामपणे सांगितले आहे. आता विद्यार्थीही म्हणतात "नॉट ओके, शिवसेना विल बी ओके" सांगोला मतदारसंघात सगळीकडे भगवाच दिसणार आहे असं सांगत खासदार विनायक राऊत यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.