नागपूर - सरकारकडे संख्याबळ आहे. त्यामुळे सरकार अस्थिर नाही हे वास्तव आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर काय होणार, तेव्हा काय परिस्थिती असेल त्यावर आता कुणालाही काही सांगता येणार नाही. परंतु सरकार स्थिर असताना ते अस्थिर आहे असं बोलणेही योग्य नाही. खरे बोलले तरी या राज्यात शिक्षा होते असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, १६ आमदार अपात्र झाले तरीही जेवढी संख्या लागेल तेवढी सरकारकडे आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादी यांना लाखोली वाहून जे महाविकास आघाडीतून बाहेर पडले, ते आज त्यांच्या येण्याची वाट पाहतायेत त्याचे कौतुक वाटते. गुलाबराव पाटील असो वा शिवसेनेतील बाहेर गेलेले जे सदस्य आहेत. भाजपाकडे जाणारी वक्तव्ये त्यांनी आठवली तर आपल्याला आश्चर्य वाटेल असं त्यांनी सांगितले.
तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल गैरसमज पसरवणे ही भाजपाची खेळी आहे. महाविकास आघाडीची सभा लोकांना नव्या मुद्द्याची माहिती देणारी असेल. आमच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन सभा आयोजित केली आहे. मविआचे घटक पक्ष सभेला उपस्थित राहतील. सभा वेळेत व्हावी यासाठी प्रत्येक पक्षाकडून २ सदस्य बोलतील हे ठरले आहेत. संभाजीनगरला २ वक्ते बोलले आहेत. आज कोण बोलणार हे थोड्यावेळाने ठरेल असंही जयंत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीत मतभेदएकीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सरकार स्थिर आहे. सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांना अपात्र केले तरी बहुमताची संख्याही कमी होईल. तितके संख्याबळ भाजपा-शिंदेंकडे आहे त्यामुळे सरकार स्थिर असल्याचे माझे मत आहे असं म्हटलं. तर सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांना अपात्र केल्यानंतर सरकार कोसळेल, वेळ आल्यावर गणित सांगू असं विधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. त्याचसोबत अजित पवारांचा अंदाज चुकणार असं मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.