मुंबई : मरिन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील विद्यार्थिनीची तेथील सुरक्षारक्षकाने हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची संतापजनक घटना ७ जून रोजी घडली होती. त्याबाबत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषद नियम १०१ अनुसार लक्षवेधी सूचना दिली होती. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी वसतिगृहांच्या सुरक्षेबाबत काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, असा प्रश्न तांबे यांनी उपस्थित केला. त्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत उत्तर दिले. वसतिगृहांच्या परिसरात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या निर्देशासह अन्य करावयाच्या उपाययोजनांबाबत विस्तृत निर्देश दिल्याची माहिती पाटील यांनी दिली.
सदर विद्यार्थिनी वांद्रे येथील पॉलिटेक्निकल महाविद्यालयात शिकत होती. मूळची अकोल्याची असलेली ही १९ वर्षीय विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले वसतिगृहात चौथ्या मजल्यावर वास्तव्यास होती. सुट्टीसाठी अकोला येथे जाण्यापूर्वीच वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकाने तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली व स्वतः ग्रॅण्ट रोड स्थानकानजीक रेल्वेगाडीखाली आत्महत्या केली होती. या घटनेमुळे वसतिगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संबंधित सुरक्षारक्षकाने यापूर्वी पहाटेच्या सुमारास तिच्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत विद्यार्थिनीने आणि तिच्या पालकांनी वसतिगृहाच्या वॉर्डन आणि अधीक्षकांकडे तक्रार करूनही त्यांनी सदर तक्रारीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले होते, असे तांबे यांनी लक्षवेधीमध्ये नमूद केले. या वसतिगृहाची क्षमता ४५० विद्यार्थीनींची असून सध्या या वसतिगृहात केवळ ४० ते ४५ विद्यार्थीनी वास्तव्यास आहेत.
गेल्या वर्षभरापासून तेथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असणे ही बाब अत्यंत बेजबाबदारपणाची व धोकादायक आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. वसतिगृहाच्या ढिसाळ कारभारामुळे एका विद्यार्थिनीचा नाहक बळी गेला आहे. वसतिगृहाच्या वॉर्डन आणि अधीक्षकांना निलंबित करण्याची संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी मागणी केली होती. या घटनेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी येणाऱ्या मुलीच्या सुरक्षिततेचा गहन प्रश्न निर्माण झाल्याकडे आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या घटनेमुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आमदार तांबे यांनी व्यक्त केली. मुंबईसह राज्यातील मुलींच्या वसतिगृहात त्यांच्या सुरक्षिततेबाबत सरकारने काय कार्यवाही, उपाययोजना याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावित्रीबाई फुले वसतिगृहात विद्यार्थीनीवर अत्याचार व हत्या झाल्याची बाब ६ जून रोजी निदर्शनास आल्याची माहिती दिली. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे मुंबई येथे ६ जून रोजी गु.र.क्र. ११९/२०२३ भा.द.वि. कलम ३०२, ३७६ (२) (ड) अन्वये संशयित आरोपी ओमप्रकाश कनोजिया याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पिडीत विद्यार्थीनीने आरोपी छेडछाड करीत असल्याची तक्रार वसतिगृह अधिक्षीका यांचेकडे केलेली नाही. मात्र, वसतिगृह सुरक्षा प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्यामुळे वसतिगृहाच्या अधिक्षीका यांना सरकारने निलंबीत केल्याची माहिती पाटील यांनी दिली.