ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - मल्टीप्लेक्समध्ये प्राईमटाइमला मराठी सिनेमा दाखवण्याच्या सक्तीबाबत राज्य सरकारने बॉलीवूडमधील सिनेनिर्मात्यांसमोर शेपूट घातले अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मल्टीप्लेक्समध्ये पाच ते सहा स्क्रिन्स असतात, यातील एक स्क्रिन मराठी सिनेमांसाठी राखीव ठेवायलाच पाहिजे, मग ते चित्रपट चालो अथवा नाही अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
मंगळवारी राज्य सरकारने या वादग्रस्त विकास आराखड्याला केराची टोपली दाखवली आहे. मुंबईच्या विकास आराखड्याला मनसेने जोरदार विरोध दर्शवला होता. राज्य सरकारच्या निर्णयानंतर मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारचे अभिनंदन केले. मात्र मल्टीप्लेक्समध्ये मराठी सिनेमाच्या सक्तीबाबत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मल्टीप्लेक्स बांधताना तेथील एक स्क्रिन मराठी सिनेमांसाठी राखीव ठेवणे, मराठी नाटकांसाठी नाट्यगृह बांधणे आणि कलादालन बांधणे अशा अनेक अटी असतात. मात्र या अटींचे सर्रास उल्लंघन केले जाते याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधले. संध्याकाळी ६ ते ९ या प्राईमटाइममध्ये मराठी चित्रपट दाखवणे सक्तीचे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय चांगला होता. मात्र बॉलीवूडमधील सिनेनिर्मात्यांनी विरोध करताच राज्य सरकारने त्यांच्यासमोर शेपूट टाकले अशी टीका त्यांनी केली.
आरे कॉलनीत कोणत्याही परिस्थितीत मेट्रो कारशेड प्रकल्प होऊ देणार नाही असा पुनरोच्चारही त्यांनी केला आहे. कोस्टल रोड, मेट्रो, जैतापूर अशा प्रकल्पांना सध्या विरोध होत आहे, मग अशा स्थितीत राज्याचा विकास कसा होणार असा सवाल विचारला असता राज ठाकरे म्हणाले, आमचा विकासकामांना विरोध नाही, लोकहिताचे प्रकल्प व्हायलाच हवे, मात्र प्रकल्प करताना स्थानिकांना विचारात घेतले जात नाही व मग विरोध होतो असे त्यांनी नमूद केले.