आॅनलाईन लोकमत कोल्हापूर, दि. १६ : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे पानसरे यांची हत्या चार मारेकऱ्यांनी केल्याचा दावा सरकारी वकील अॅड. निंबाळकर यांनी सुनावणीवेळी केला. त्यांच्या हत्याप्रकरणी सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक संशयित समीर विष्णू गायकवाड याच्याविरोधात प्रथमदर्शनी भक्कम पुरावे असून, प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळख परेडमध्ये समीरला ओळखले आहे. त्यामुळे समीरला जामीन मंजूर करू नये. त्याला जामीन मंजूर झाल्यास सनातन संस्थेच्या इतर साधकांप्रमाणे तो फरार होईल आणि साक्षीदारांवर दबाव आणू शकेल, असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात केला.
जिल्हा न्यायाधीश क्रमांक चार एल. डी. बिले यांच्या न्यायालयात शुक्रवारी ही सुनावणी झाली. सरकारतर्फे निंबाळकर यांनी सुमारे अडीच तास युक्तिवाद केला. यावर समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर शनिवारी निकाल देऊ, असे न्या. बिले यांनी सांगितले.
अॅड. हर्षद निंबाळकर म्हणाले, समीर गायकवाड याच्याविरोधात प्रथमदर्शनी भक्कम पुरावे आहेत. त्याचबरोबर एका साक्षीदाराने त्याला ओळखले आहे. हा साक्षीदार घटनेदिवशी म्हणजे १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सायकलवरून घटनास्थळावरून शिकवणीच्या शिक्षिका यांच्याकडे जात होता. त्यावेळी या साक्षीदाराने संशयित आरोपीला पाहिले होते. त्यानंतर ही माहिती त्याने शिकवणीच्या शिक्षिका, त्याचे क्लासमधील मित्र आणि आई-वडील यांना सांगितली होती. दरम्यान, या प्रकरणी समीर गायकवाडला पोलिसांनी अटक केल्यानंतर ओळख परेडमध्ये त्या साक्षीदाराने समीरला ओळखले.त्याचबरोबर सनातन संस्थेची साधक असलेली ज्योती कांबळे, अंजली झरकर व आणखी एका साधकाला ‘ज्याला मारायचे होते, त्याला मारले आहे, ते म्हणजे कामगार युनियन नेते.’ तसेच ‘लय पापं केली आहेत, त्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्याला जातो आणि पाण्यात डुबकी मारून येतो,’ असेही संभाषण समीरने मोबाईलवरून केले आहे. तसेच त्याच्या घरातून क्षात्रधर्माची पुस्तके जप्त केली. पानसरे यांनी वेळोवेळी ‘सनातन’विरोधात अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात दावे दाखल करण्यात आले होते. यावरून या बाबी दुजोरा देणाऱ्या आहेत. यापूर्वी समीर गायकवाडचा जामीन अर्ज उच्च व जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे, असा युक्तिवाद अॅड. हर्षद निंबाळकर यांनी केला.यावर हरकत घेत समीरचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी, सनातन संस्था कायदा हातात घेत नाही, कायद्यानेच जाते. ‘जन्माला आलो हे पाप केले आहे, जन्माला येऊन काहीच केले नाही,’ असे समीर म्हणाला आहे. त्याचबरोबर फोटो अल्बमवरून फरार विनय पवार व सारंग अकोळकर यांना उमा पानसरे यांनी ओळखले आहे. यावरून पानसरे हत्या प्रकरणात समीरचा काही संबंध दिसत नाही. त्यामुळे त्याला जामीन मिळावा ही विनंती केली. यावेळी सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे, तपास अधिकारी तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मेघा पानसरे उपस्थित होते.
दाभोलकर हत्येप्रकरणी जप्त केलेले पिस्तूल पानसरे हत्या प्रकरणात वापरले नसल्याचे स्पष्ट
गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये घटनास्थळावर सापडलेल्या पुंगळ्या व त्यांच्या शरीरामधून काढण्यात आलेली एक गोळी यावरून नरेंद्र दाभोलकर व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये अशाच प्रकारच्या गोळ्या वापरल्याचा निष्कर्ष बंगलोर व मुंबईच्या फॉरेन्सिक लॅबमधून आलेल्या अहवालावरून काढण्यात आला आहे. त्यामुळे या हत्येमध्ये एकच शस्त्र असल्याचे स्पष्ट होत आहे. यासाठी पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिसऱ्यांदा अहमदाबाद येथील प्रयोगशाळेत पुंगळ्या व गोळी पाठविण्यात आली आहे. त्याचा बॅलेस्टिक रिपोर्ट यायचा असल्याचे अॅड. निंबाळकर यांनी न्यायालयात सांगून, दाभोलकर हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी जप्त केलेले पिस्तूल हे पानसरे हत्या प्रकरणात वापरण्यात आले नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
पानसरे हत्येच्या आदल्या दिवशी टेहळणी
पानसरे यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी दोन दुचाकीवरून चार संशयित सागरमाळ परिसरात टेहळणी करीत होते; तर हत्येदिवशी रेड्याची टक्कर येथे एका दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीस्वाराला ‘एवढा वेळ का लागला? असा प्रश्न केला होता, असा जबाब एका साक्षीदाराने पुरवणी जबाबात दिल्याचे अॅड. निंबाळकर यांनी सांगितले.
समीरचा जामीन अर्ज या दिवशी फेटाळला
१६ जानेवारी २०१६ २३ मार्च २०१६ (जिल्हा न्यायालय) ७ सप्टेंबर २०१६ (उच्च न्यायालय)