मुंबई : आज १० ते १५ वर्षे मुंबईत राहणाऱ्या लोकांना मराठी समजते, परंतु कित्येक मंत्री मराठीसोबत हिंदी, इंग्रजीचा वापर करतात. शासकीय पातळीवरच मराठीला दुय्यम स्थान दिले जाते, असे जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.जागतिक मराठी अकादमी व पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ आणि सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया यांच्या वतीने जागतिक मराठी अकादमीचे १७वे संमेलन ‘शोध मराठी मनाचा’ हे ७ ते ९ जानेवारी दरम्यान पीएनपी नाट्यगृह, अलिबाग येथे आयोजित करण्यात आले आहे. चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील व्यक्ती यात सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.फुटाणे पुढे म्हणाले की, मंत्री स्तरावर मराठीसह इतर भाषेचा वापर केला जातो, तर सामान्य नागरिकांनाही इंग्रजी माध्यमांचे आकर्षण आहे. प्रत्येक जण आपले मूल इंग्रजी शाळेत जावे, यासाठी प्रयत्नशील आहे. मुलांना मराठी शाळेत घालण्यासाठी पालक फारसे उत्सुक नसल्याचे पाहायला मिळत आहे. ही चिंतेची बाबत आहे. प्रत्यक्षात मराठीला दुय्यम स्थान न देता, आपण प्रत्येकाने मराठीचा आग्रह धरला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पाच वर्षे प्रयत्न करूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नसेल, तर ते आपले दुर्दैव आहे, अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
शासकीय पातळीवरच मराठीला दुय्यम स्थान - फुटाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 4:19 AM