मुंबई : एरवी विरोधकांचा बहिष्कार, सभात्याग ही नित्याची बाब बनली असताना, मंत्र्यांसकट सत्ताधारी पक्षातील सदस्यांनीच सभात्याग करण्याचा अभूतपूर्व प्रकार आज विधान परिषदेत घडला! विधिमंडळाच्या इतिहासात ठळक अक्षरात नोंदली जाईल, अशी घटना घडल्यानंतर, सरकारने पळ काढल्याचा आरोप विरोधकांनी केला.गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प, हे सध्या चर्चेचे आणि विरोधकांच्या टार्गेटचे मुद्दे बनले आहेत. विधान परिषदेत राष्ट्रवादीचे सदस्य किरण पावसकर यांनी लक्षवेधी सूचनांवरील चर्चेदरम्यान बोरीवलीच्या देवीपाडा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. यावर राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी संबंधितांच्या चौकशीचे आश्वासन दिले, पण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एसआरए प्रकल्पातील गैरव्यवहारावरून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर निशाणा साधला.‘एसआरए’ घोटाळ्यांचे धागेदोरे थेट मंत्रालयात पोहोचले असून, स्वत: गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप मुंडे यांनी केला. घाटकोपर येथील सुमारे १९ हजार चौरसमीटरचा भूखंड २००६ साली निर्मल होल्डिंग कंपनीला पुनर्विकासासाठी देण्यात आले होते. मात्र, कंपनीने नियमबाह्य काम केल्याने हा भूखंड शासनाने परत घेतला. प्रकाश मेहता यांनी हाच भूखंड परत त्याच कंपनीला दिल्याचे मुंडे म्हणाले.मुंडे यांच्या थेट आरोपावर सत्ताधारी सदस्यांनी हरकत घेतली आणि एकच गदारोळ झाला. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने, उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. यानंतर, सभागृहाचे कामकाज सुरू झाले, तेव्हा पुन्हा मुंडे यांनी प्रकाश मेहतांचा विषय उपस्थित केला. सभागृह नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील बोलण्यास उभे राहिले. मात्र, त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपा, शिवसेना सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकत, चक्क सभात्याग केला. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी साभत्याग करताच, गिरीश बापट, चंद्रकांत पाटील, रवींद्र वायकर, अर्जुन खोतकर हे मंत्रीही सभागृहाबाहेर पडले!सत्ताधारी पक्ष सदस्यांच्या अनुपस्थितीच पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. विनियोजन विधेयकही मंजूर झाले. सत्ताधाºयांना अडचणीत आणण्याचा आमचा उद्देश नव्हता. आजचा प्रकार दुर्दैवी आहे, असे सांगत, सभापतींनी सत्ताधाºयांना कामकाजात सहभागी होण्याचे आवाहन करावे, अशी विनंती संजय दत्त, हेमंत टकले, शरद रणपिसे आदी सदस्यांनी केली. शेवटी सभापती माणिकराव ठाकरे यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.वायकरांची पंचाईतएसआरए घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केल्याने, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची चांगलीच पंचाईत झाली. काय उत्तर द्यावे, हे वायकर यांना सूचेचना.कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा राज्यमंत्री घेणार का? मुंडेंच्या या गुगलीने सभागृहात एकच हशा पिकला. शिवसेना गटनेते अनिल परब यांनी वायकरांना प्रश्नाला बगल देण्याचा इशारा केला. तेव्हा प्रसंगावधान राखत, वायकरांनी हा प्रश्न लक्षवेधीशी संबंधित नसल्याचे सांगत, स्वत:ची सुटका करून घेतली.
सरकारचाच सभात्याग! विधान परिषदेत अभूतपूर्व प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 4:39 AM