मिरज : मिरजेतील शासकीय दूध डेअरी दुधाअभावी दोन वर्षे बंद आहे. १९६६ मध्ये उभारण्यात आलेल्या दूध योजनेची जुनी इमारत जीर्ण झाल्याने इमारतीचे रचनात्मक परीक्षण करण्याचा आदेश दुग्धविकास विभागाने दिला आहे. यामुळे शासकीय दूध डेअरी पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. दुष्काळामुळे मराठवाड्यातून येणारे अतिरिक्त दूधही बंद झाल्याने मिरज डेअरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. राज्यात शासकीय दूध योजनेच्या मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, उदगीर व मिरज या मोठ्या योजना आहेत. मराठवाड्यातील अतिरिक्त दूध दरवर्षी मिरजेच्या डेअरीत पाठविण्यात येत होते. मिरजेच्या दूध डेअरीत दैनंदिन दोन लाख लिटर दुधावर प्रक्रिया करून दूध भुकटी निर्मितीची यंत्रणा आहे. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या दुधाच्या हंगामात अतिरिक्त होणारे दूध मिरज डेअरीत प्रक्रियेसाठी येत होते. पश्चिम महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन मोठे असले तरी, येथील सहकारी व खासगी संघांच्या दूध संकलनामुळे शासकीय दूध योजनेकडे येथील एक लिटर दूधही येत नाही. मराठवाड्यात खासगी व सहकारी दूध संघ नसल्याने अतिरिक्त दूध शासकीय योजनेकडे येत होते. मात्र यावर्षीच्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील दूध बंद झाल्याने तेथील अतिरिक्त दुधावर अवलंबून असलेली मिरजेतील डेअरी सुरू झालेली नाही. सुमारे ५० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या मिरज दूध डेअरीची इमारत जीर्ण झाली आहे. यामुळे दुग्धविकास विभागाने मिरज दूध डेअरीच्या इमारतीचे बांधकाम तज्ज्ञांकडून रचनात्मक परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. रचनात्मक परीक्षण करून इमारतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, मात्र मिरज डेअरीतील दुधाची भुकटी तयार करणारी जुनी यंत्रणा कालबाह्य झाली असल्याने नूतनीकरणाच्या खर्चास मान्यता मिळालेली नाही. यामुळे मिरजेची दूध योजना इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असून, यापुढे डेअरी सुरू होणे कठीण असल्याचे सांगण्यात आले. डेअरी बंद असल्याने डेअरीतील सुमारे दोनशे कामगारांच्या हाताला काम नसल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)दूध योजनेचा पांढरा हत्तीमिरजेतील शासकीय दूध योजना अनेक वर्षांपासून बंद आहे. डेअरीतील दोनशे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा सुमारे चाळीस लाख खर्च होतात. डेअरी सुरूझाल्यास जुन्या यंत्रणेमुळे दुधावर प्रक्रिया करण्यासाठी येणारा खर्च मोठा असल्याने तोट्यात आणखी वाढ होते. रेल्वे टॅँकरने दूध नेण्या-आणण्यासाठी डेअरीत थेट रेल्वे मार्ग असलेली मिरजेतील एकमेव शासकीय डेअरी होती. रेल्वेमार्गाच्या देखभालीसाठी द्यावा लागणारा वार्षिक अडीच लाखाचा खर्च परवडत नसल्याने रेल्वेमार्ग बंद करण्यात आला आहे. शासकीय दूध डेअरीचा तोटा दरमहा सुमारे एक कोटी रुपये आहे. बंद डेअरीतील दूध पावडर यंत्रणेच्या नूतनीकरणासाठी पंधरा कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे.
मिरजेतील शासकीय दूध योजना बंद होणार
By admin | Published: December 17, 2015 12:07 AM