मुंबई : मुंबईत येणारे परप्रांतीयांचे लोंढे रोखण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही. सामान्य प्रशासन विभागाच्या अंदाजपत्रकात आलेला मुद्दा २००८ पासूनचा आहे आणि तो याही वेळी प्रकाशित झाला, असे सांगून सरकारने या मुद्द्यावरून घूमजाव केले. यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईतील परप्रांतीयांचे लोंढे रोखण्यासाठी तरतूद करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत‘ने ३० मार्चच्या अंकात प्रकाशित केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विनिनियोजन विधेयक मंजूर करतेवेळी सारवासारव करण्याचा प्रयत्न करीत लोकमतमधील वृत्त म्हणजे राईचा पर्वत करण्यासारखे आहे, असे सांगितले. मात्र, भाजपाचे आ. आशिष शेलार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता हे सांगण्याचे अर्थमंत्र्यांनी खुबीने टाळले. आ. शेलार यांनी घेतलेल्या ओक्षपाकडे लक्ष वेधले असता ‘शेलार यांनी काय भाषण केले ते मला माहित नाही. कदाचित हा विषय समजण्याची त्यांची गल्लत झाली असावी’, असा खुलासाही मुनगंटीवार यांनी केला. सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यक्रम अंदाजपत्रकात कार्यासन क्र. २९ अ मध्ये ‘मुंबईत परप्रांतियांचे येणारे लोंढे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत’ असा दहाव्या नंबरचा मुद्दा आहे. जर यासाठी आर्थिक तरतूदच नाही तर हा विषय बजेटच्या अंदाजपत्रकात कसा आला, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यावर अर्थमंत्र्यांचे म्हणणे असे की, कोणत्या डेस्कने या प्रश्नाचे उत्तर द्यायचे हे निश्चित करण्यासाठी तो उल्लेख आहे. जर अर्थमंत्र्यांचे म्हणणे ग्राह्ण धरले तर हा विषय अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात न येता तो ‘सामान्य विभागाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये’ यात यायला हवा होता, पण तसे घडलेले नाही. (विशेष प्रतिनिधी)
लोंढे रोखण्यावरून सरकारचे घूमजाव
By admin | Published: April 02, 2015 5:18 AM