पुणे :मुख्यमंत्री बदलावा, ही मागणी चुकीची असून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी आहोत. सरकारने मराठा समाजासाठी अनेकदा पुढाकार घेतला असून हे सरकार मराठा समाजाच्या विरोधात आहे, हे म्हणणे चुकीचे आहे, असे शिवसंग्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पुण्यात सांगितले.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्रमाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक टिळक रस्त्यावरील डॉ.नितू मांडके सभागृहात पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, मराठा समाज व इतरांना त्रास होणार नाही, अशा शांततेच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करायला हवे. आरक्षणाच्या लढयाला कोणा एकाचे नेतृत्व मान्य नसेल, तर प्रत्येक जिल्हयातील आंदोलनकर्त्यांमधील ५-६ लोकांनी एकत्र येऊन सामुहिकपणे चर्चा करण्याकरीता पुढे यायला हवे. तसेच समाज बांधवांसमोर ही चर्चा लाईव्ह असणे गरजेचे आहे.
पुढे ते म्हणाले की, आताच्या सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घेतले, परंतु त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही. आदेश काढले गेले, मात्र त्यामध्ये त्रुटी होत्या. याला प्रशासनातील लोक देखील जबाबदार आहेत. मागासवर्गीय आयोगाचा जोपर्यंत अहवाल येत नाही. तोपर्यंत कायद्याप्रमाणे देखील त्याला आधार नाही. मुस्लिम व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अनेक वर्षे मागणी होत आहे. तो विषय कायद्यातून कसा मार्गी लावता येईल, हे सरकारने ठरवायला हवे