डोर्लेवाडी : शासनाच्या धोरणाविरोधात अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलने केली आहेत. अजूनदेखील आंदोलने करावी लागतील, त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही. शेतकऱ्यांच्या कुठल्याच पिकाला भाव मिळत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.डोर्लेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय, व्यायामशाळा, अंगणवाडी अशा विविध विकासकामांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले की, आता आम्ही काढलेल्या संघर्ष यात्रेवरदेखील मुख्यमंत्री टीका करीत आहेत. पाण्याच्या बाबतीत आता शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. शेतकऱ्यांना शेततळी आणि ठिबकसिंचन केल्याशिवाय गत्यंतर नाही. नीरा देवघरचे काम चालू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मिळणारे ६ टीएमसी पाणी बंद होणार आहे. आज आपण या पुढे पाण्याच्या वापर व्यवस्थित करणे आवश्यक आहे.या वेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, बांधकाम सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, बारामती पंचायत समिती सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश गोफणे, सरपंच राधाबाई जाधव, अशोक नवले, रमेश मोरे, प्रतिभा नेवसे, गौरी शिंदे, प्रियांका निलाखे, प्रभावती नाळे ,अश्विनी म्हेत्रे , विनोद नवले, शंभू भोपळे, कृष्णात जाधव, संतोष नेवसे, अविनाश काळकुटे, बापूराव गवळी, अतुल भोपळे, किरण तावरे, श्रीपती जाधव, कांतीलाल नाळे, ग्रामविकास अधिकारी संजय म्हेत्रे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाट्या लागण्यासाठी काम करीत नाहीएखाद्याने कामासाठी काही काम न करता हक्क दाखविणे सद्सदविवेक बुद्धीला न पटणारे आहे. बारामती तालुक्यात भूमिपूजन उद्घाटनाच्या पाट्या लागण्यासाठी पवार कुटुंबीयातील कोणीही काम करीत नाही. अनेक जणांनी पवार कुटुंबीयाची काम करण्याची पद्धत बघितली आहे. आपण आपल्या पक्षाचे नियम पाळूया, दुसऱ्यांनी पाळायचे का नाही तो त्यांचा प्रश्न आहे, असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
भाजपा-सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कापली रिबनराष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन करण्यापूर्वीच रविवारी (दि. ३०) पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, भाजपाचे नेते प्रशांत सातव, नगरसेवक बबलू देशमुख, विष्णू चौधर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र काळे आदी या ठिकाणी पोहोचले. यावेळी ग्रामपंचायतीच्या समोर या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या नावचा फलक लावण्यात आला. त्यानंतर कार्यालयाची रिबन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कापून उद्घाटन करण्यात आले. उपसरपंच काळकुटे यांचे नाव या फलकावर निमंत्रक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.