तुरुंगात नवनीत राणांना वाईट वागणूक दिली जात असल्याच्या आरोपांवरून लोकसभेने राज्य सरकारला २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. राणा यांनी याबाबतचा ईमेल लोकसभा अध्यक्षांना पाठविला होता. यावरून तातडीने ही कारवाई करण्यात आली आहे.
ना पिण्यासाठी पाणी दिले जात आहे, ना वॉशरुमला जाऊ दिले असा आरोप राणा यांनी महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांवर केला होता. यावर लोकसभा सचिवालयाने महाराष्ट्र सरकारला २४ तासांची वेळ दिली आहे. याचबरोबर लोकसभेच्या हक्कभंग समितीनं नवनीत राणा यांना बेकायदा अटक केल्या प्रकरणी २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. मला २३ तारखेला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. 23 एप्रिलला मला संपूर्ण रात्र पोलीस ठाण्यातच काढावी लागली. रात्री अनेकवेळा पाणी मागितले, पण रात्रभर पाणी दिले नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले की, मी अनुसूचित जातीची आहे, त्यामुळे ते ज्या ग्लासात पितात त्याच ग्लासात ते मला पाणी देऊ शकत नाहीत. म्हणजे माझ्या जातीमुळे मला प्यायलाही पाणी दिले गेले नाही. यामुळे मला मानवाधिकारांपासून वंचित ठेवण्यात आल्याचे नवनीत राणा यांनी या पत्रात म्हटले होते.
मला रात्री बाथरूमला जायचे होते, परंतू पोलिसांनी माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केले. मला शिवीगाळ करण्यात आली. तसेच खालच्या जातीतील लोकांना आमचा बाथरूम वापरू देत नाही, असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सरकार हिंदुत्वाच्या तत्त्वांपासून पूर्णपणे विचलित झाले आहे. ज्याच्या जोरावर ते सत्तेत आले ते लोकांच्या विश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ठाकरे सरकारवर केला आहे.