मुंबई: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील ७ दिवस सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यामुळे आता ७ दिवस सरकारी कार्यालयं आणि आस्थापनं बंद असतील. मात्र अत्यावश्यक सेवांना यामधून वगळण्यात आलंय. कॅबिनेटची बैठक अद्याप सुरूच आहे. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे उपाय योजण्यावर बैठकीत चर्चा झाली. यानंतर सरकारी कार्यालयं सात दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता सात दिवस राज्यातली सर्व सरकारी कार्यालयं बंद राहतील. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येतील. सरकारी कार्यालयांमध्ये कायम गर्दी असते. त्याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळानं हा मोठा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे सेवेसह सार्वजनिक वाहतुकीसंदर्भातही मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला रेल्वेचे अधिकारीदेखील उपस्थित आहेत. रेल्वे, मेट्रो, बस सेवा पूर्णपणे बंद केली जाणार की त्यांची संख्या काही प्रमाणात कमी केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज सकाळीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबद्दलचे संकेत दिले होते. रेल्वे, मेट्रोचा विषय थेट माझ्या खात्याशी संबंधित नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असं टोपेंनी सांगितलं होतं. लोकल आणि मेट्रोमधील गर्दी टाळण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याची हमी राजेश टोपेंनी दिली. देशभरातल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या १३४ इतकी आहे. यातले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यातील परिस्थिती संवेदनशील असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. खासगी कंपन्यांनी शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी द्यावी. यासंदर्भात २० ते २५ कंपन्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
Coronavirus: सर्व सरकारी कार्यालयं ७ दिवसांसाठी बंद; राज्य सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 4:47 PM
Coronavirus: ७ दिवस सरकारी कार्यालयं आणि आस्थापनं बंद; अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
ठळक मुद्दे७ दिवस सरकारी कार्यालयं आणि आस्थापनं बंदकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णयकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय