गणेश मापारी ,खामगाव (जि. बुलडाणा)सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अंत्योदय व बीपीएल योजनेच्या लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी देण्यात आलेली तूरडाळ खुल्या बाजारापेक्षा महाग असल्यामुळे लाभार्थ्यांनी खरेदी केली नाही. ही माहिती शासनाला पोहोचल्याने सप्टेंबर आणि आॅक्टोबर या दोन महिन्यांचे डाळीचे नियतनच आले नसून ही योजना एकाच महिन्यात गुंडाळल्याचे संकेत आहेत.तूरडाळीचे भाव २०० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने गरिबांच्या ताटातील वरण गायब झाले होते. तूरडाळीचे भाव कमी करण्यासाठी शासनाकडे विविध सामाजिक संघटनांकडून अनेक निवेदने देण्यात आली. तसेच या बाबीकडे विविध राजकीय पक्षांनीही शासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांमधून बीपीएल व अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना डाळ वितरण करण्याची योजना शासनाने आखली. आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यांमध्ये लाभार्थ्यांना डाळ वितरित करण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या पुरवठादारांना डाळ पुरविण्याचे आदेश दिले. दरम्यान, स्वस्त धान्य दुकानांमधून देण्यात येणाऱ्या डाळीचा दर प्रति किलो १०३ रुपये असा ठेवण्यात आला, तर बाजारपेठेत ७० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने चांगली तूरडाळ मिळत आहे. त्यामुळे बहुतांश गावांतील अंत्योदय आणि बीपीएल योजनेच्या लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानांमधील तूरडाळ खरेदी केली नाही.
सरकारी तूरडाळ गरिबांना परवडेना!
By admin | Published: October 07, 2016 5:58 AM