- गणेश मापारी/ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि.06 - सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अंत्योदय व बिपीएल योजनेच्या लाभार्थ्यांना वितरीत करण्यासाठी देण्यात आलेली तुरडाळ खुल्या बाजारापेक्षा महाग असल्यामुळे लाभार्थ्यांनी खरेदी केली नाही. ही माहिती शासनाला पोहचल्याने आगामी सप्टेंबर आणि आॅक्टोबर या दोन महिन्याचे डाळीचे नियतनच आले नसून ही योजना आता एकाच महिन्यात गुंडाळल्याचे चित्र आहे.
तुरडाळीचे भाव २०० रुपये किलो पर्यंत पोहचल्याने गरीबांच्या ताटातील वरण गायब झाले होते. तुरडाळीचे भाव कमी करण्यासाठी शासनाकडे विविध सामाजिक संघटनांकडून अनेक निवेदने देण्यात आली. तसेच याबाबीकडे विविध राजकयी पक्षांनीही शासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांमधून बीपीएल व अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना डाळ वितरण करण्याची योजना शासनाने आखली. आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यांमध्ये लाभार्थ्यांना डाळ वितरीत करण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या पुरवठादारांना डाळ पुरविण्याचे आदेश दिले. दरम्यान स्वस्त धान्य दुकानांमधून देण्यात येणाºया डाळीचा दर प्रतिकिलो १०३ रुपये असा ठेवण्यात आला. तर बाजारपेठेत ७० रुपयांपासून तर ९० रुपये प्रतिकिलो प्रमाणे चांगली तुरडाळ मिळत आहे. त्यामुळे बहुतांश गावातील अंत्योदय आणि बीपीएल योजनेच्या लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानांमधील तुरडाळ खरेदी केली नाही. पुरवठा विभागाने आॅगस्ट महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातील १६ शासकीय गोदामांमध्ये २ हजार ७७ क्विंटल तुरडाळ पुरवठा करण्याचे आदेश पुरवठादाराला दिले. त्यानुसार या सर्व शासकीय गोदामांमध्ये तुरडाळ पाठविण्यात आली. काही गावांमधील रास्तभाव दुकानदारांनीच तुरडाळीची उचल केली नाही. तर उचल करण्यात आलेल्या स्वस्तधान्य दुकानांमधून लाभार्थ्यांनी डाळ खरेदी केली नाही. ही माहिती शासनाला कळविण्यात आल्याने शासनाकडून आता बुलडाणा जिल्ह्यासाठी आगामी दोन महिन्याचे तुरडाळीचे नियतनच देण्यात आलेले नाही.
पुरवठादार निवडीचा उरफाटा कारभार
बीपीएल आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना तुरडाळ देण्यासाठी शासनाने पुरवठादारांना डाळ पुरविण्याचे आदेश दिले. मात्र पुरवठादार निवडताना शासनाने फार उरफाटा कारभार केला आहे. अकोल्यातील पुरवठादारांनी बुलडाणा आणि इतर जिल्ह्यांमध्ये तुरडाळीचा पुरवठा करावा तर बुलडाणा जिल्ह्यातील पुरवठादारांनी वेगळ्याच जिल्ह्यात डाळीचा पुरवठा करावा असे नियोजन करण्यात आले. बाजारपेठेत तुरडाळ महाग झाल्यानंतर स्वस्तधान्य दुकानांमधून डाळ देण्याच्या निर्णयाप्रमाणेच पुरवठादारांच्या निर्णयामध्येही शासनाची घोडचूक झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
डाळीचा दर्जाही निकृष्ट
स्वस्तधान्य दुकानातून वितरीत करण्यासाठी देण्यात आलेली तुर डाळ निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहेत. तुरडाळीमध्ये वटाणा डाळ मिश्रीत असून ही डाळ बारीक व भुकटी असलेली आहे. गरीब लाभार्थ्यांना रास्त दरात डाळ देण्याचा गाजावाजा केल्या जात असला तरी लाभार्थ्यांच्या पसंतीस मात्र ही तुरडाळ उतरली नाही.