मुंबई : प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेतील सूक्ष्म सिंचन उत्पादक, वितरक आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे मत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. 'पर ड्रॉप मोअर क्रॉप'अर्थात प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन या योजनेतील अडचणींबाबत इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि.१०) धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
सूक्ष्म सिंचन योजनेचा केंद्र सरकारकडून देण्यात येणारा निधी लवकरात लवकर प्राप्त करून घेऊन त्याचे वितरण करण्यात येईल, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांच्या पूरक अनुदानात योजनातील नियमावलीत बदल करून उत्पन्नाची अट शिथिल करण्याबरोबरच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पूरक अनुदानाची कमाल मर्यादा वाढवणे यासाठी शासन सकारात्मक आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
याचबरोबर, महाडीबीटी पोर्टलवरील अडचणींची सोडवणूक करण्यात येईल,असे धनंजय मुंडे यांनी आश्वासित केले. तसेच इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाला राज्यस्तरीय समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्याबाबत वेगळा प्रस्ताव सादर करा, असे आदेश सुद्धा धनंजय मुंडे यांनी दिले. दरम्यान, या बैठकीत इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष झुंबरलाल भंडारी, उपाध्यक्ष के एम महामूलकर, सचिव संदीप जवळेकर, कमलेश दास, तसेच शासनाच्या कृषी विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.