मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन दोन वर्षे होत आली तरीही शिक्षण विभागाचा कारभार अद्यापही आघाडी सरकारसारखाच सुरू असून, विद्यार्थ्यांच्या समस्या पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. त्यामुळे पूर्वीच्या व आताच्या सरकारमध्ये काहीही बदल असल्यासारखे वाटत नाही, असा टोला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी युती सरकारला लगावला. ‘केजी टू पीजी’ शिक्षणाच्या गोंधळाविरुद्ध सरकारला आणि शिक्षण खात्याला जाग आणण्यासाठी युवासेनेच्या वतीने आयोजिलेल्या मोर्चात ते बोलत होते. या वेळी त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे टीका करीत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास त्यांना मंत्रिपदावरून घालविण्याचा इशारा दिला. गिरगाव चौपाटीजवळील विल्सन महाविद्यालयापासून ते मरिन लाइन्सपर्यंत मोर्चा काढण्यात आला. इस्लाम जिमखान्याच्या मैदानावर त्याचे सभेत रूपांतर झाले. या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले, ‘युतीचे सरकार आल्यानंतर चांगले बदल होण्याची अपेक्षा होती, पण गेल्या दोन वर्षांत शैक्षणिक क्षेत्र विकासासाठी हवा तो बदल झालेला नाही. शैक्षणिक सुधारणेसाठी अनेकदा शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली; मात्र त्याबाबत आतापर्यंत आश्वासनांशिवाय काही मिळाले नाही. त्यामुळे आता मागण्यांनाही ‘एटीकेटी’ लागली की काय? अशी भीती वाटायला लागली आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांना मोठ्या देणग्या द्याव्या लागतात. शाळेत मूल शिकायला येते की, प्रवेशापूर्वीच्या मुलाखतीला सामोरे जायला हे कळेनासे झाले आहे. या डोनेशनविरुद्ध कायदा हवा. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा परिणाम नववीच्या विद्यार्थ्यांवर होत आहे. नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दीड लाख इतकी आहे. अकरावी प्रवेशासाठीचा गोंधळ तर अजूनही संपलेला नाही. ‘एमकेसीएल’ आहे तरी कोण? त्याच्या मागे कोण आहे? आॅनलाइन प्रवेशाने गोंधळ होत आहे हे कळत असूनही आॅनलाइन प्रवेशाचा घाट कशासाठी घातला जात आहे, हे स्पष्ट होत नसल्याचे सांगत ठाकरे यांनी निट, विधी, सीईटी गोंधळाला सरकार जबाबदार असल्याची टीका केली. मोर्चामध्ये शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, आदेश बांदेकर, सिनेट सदस्य वरुण सरदेसाई, प्रदीप सावंत, साईनाथ दुर्गे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)ओझ्याचे काय?दप्तरांची ओझी कमी करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने वारंवार देऊनदेखील अजूनही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी झालेले नाही, असे सांगून डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या सरकारने हा प्रश्न पहिल्यांदा सोडवावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.निवडणुका डोळ््यासमोर ठेवून मोर्चा - विनोद तावडेयुवासेनचा मोर्चा हा शिक्षणाच्या प्रश्नावर आहे की आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काढलेला मोर्चा आहे असा प्रश्न पडतो, असे प्रत्युत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.
हेही सरकार मागील सरकारप्रमाणेच!
By admin | Published: October 16, 2016 2:41 AM