मुंबई : गुटखाबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांविरोधात संघटीत गुन्हेगारीसाठी असलेल्या मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची सरकारची तयारी आहे, असे प्रतिपादन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी (16 मार्च) विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केले. राज्यात गुटखाबंदी असताना गुटखा सहजरित्या उपलब्ध होत असल्याबद्दल भाजपाचे गिरीश व्यास यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, या प्रश्नाला उत्तर देताना बापट यांनी राज्यात गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने गुटखाबंदी संबंधित कायद्यात बदल करून तो अधिक कठोर करणार असल्याची ग्वाही दिली.
सुगंधीत सुपारी आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या खर्याला गुटखाबंदीचे नियम लागू होतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. यासंदर्भात केंद्र सरकारने सुधारित कडक कायदा आणलेला आहे , या कायद्याअंतर्गत गुटखाबंदीचे उल्लंघन करणाऱ्याला सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे मात्र छोट्या दुकानांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे त्यानुसार जनजागृती करण्याचे काम सुरू आहे असे बापट यांनी सांगितलं.
या प्रश्नाच्या चर्चे दरम्यान शिवसेनेचे अनिल परब यांनी झोपडपट्ट्यांमध्ये गुटखा तयार करण्यात येत असल्याचे सांगत गुटखा तयार करणाऱ्या लोकांचे गँगस्टरशी संबंध असल्यामुळे नागरिक तक्रार करायला पुढे येत नाहीत असे निदर्शनास आणून दिले, यावर उत्तर देताना बापट यांनी अन्न आणि औषध प्रशासनाने भरारी पथके नेमली असून संबंधित कायदा कठोर करणार असल्याचे आश्वासन दिले.
गुटखाबंदीची लक्षवेधी सूचना का उपस्थित केली? म्हणून अन्न व औषध प्रशासनाचा अधिकारी आर. डी. आकरूपे यांनी भाजपा आमदारासह आपल्या विधान भवनातील कार्यालयात येऊन धमकी दिली, असा धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला आहे.