अमरावती : शासनाच्यावतीने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने २०१६ पासून स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, आदर्श ठरलेल्या गावांकडून जुनीच विकासकामे दाखवून वारंवार पारितोषिक स्वीकारले जात असल्याने शासनाच्यावतीने अशी गावे पुढील दोन वर्षांसाठी स्मार्ट ग्राम योजनांतर्गत विचारात न घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत निकषानुसार जिल्हास्तरावर निवड झालेल्या गावांची निवड तालुकास्तरावर करण्यात येत होती तसेच तालुकास्तरावर स्मार्ट ग्राम घोषित केलेल्या ग्रामपंचायतीला त्याच विकासाच्या आधारे जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी नामनिर्देशित करण्यात येत होते. दरम्यान, शासनाच्या विविध पुरस्कार योजनेंतर्गत गावांकडून पुन्हा तीन विकासकामे दाखवून पारितोषिक मिळविले जात होते. त्यामुळे इतर गावांना पुरस्काराची संधी मिळत नव्हती.
दरम्यान, जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत तसेच तालुक्यातील स्मार्ट ग्राम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना संबंधित विकासकामांच्या आधारे वारंवार पारितोषिक न देण्याबाबत शासनाने भूमिका घेतली होती. दरम्यान, शासननिर्णयानुसार स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनांतर्गत जिल्हा आदर्श ग्राम पुरस्कारप्राप्त गावे आणि तालुका आदर्श ग्राम पुरस्कारप्राप्त गावांना त्याच विकासकामांच्या आधारे पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी स्मार्ट ग्राम योजनांतर्गत पुरस्कारासाठी विचारात न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे स्मार्ट ग्राम पुरस्कारप्राप्त गावांकडून जुनीच कामे दाखवून वारंवार पारितोषिक मिळविण्याचा प्रकार बंद करण्याच्या निर्णयामुळे इतर गावांना फायदा होणार आहे. आदर्श ग्राम योजनेची जुनी कामे दाखविण्याच्या प्रकारामुळे इतर विकास झालेली गावे दृष्टिआड गेली होती. जुनीच कामे दाखवून पारितोषिक लाटणाºया गावांना शासनानिर्णयामुळे चाप बसणार आहे.