नागपूर : राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भासंदर्भात भूमिका मांडल्याने शिवसेनेसह विरोधी सदस्यांनी त्यांना पदमुक्त करण्याची मागणी केली आहे. यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असल्याने, अणेंसंदर्भात मंगळवारी सकाळपर्यंत सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. विदर्भ स्वतंत्र झाल्याशिवाय विकास शक्य नाही, अशा आशयाचे वक्तव्य अणे यांनी ६ डिसेंबरला केले, अणे यांनी राज्याचे महाधिवक्ता म्हणून शपथ घेतलेली असल्याने, त्यांना वैयक्तिक मत व्यक्त करता येत नाही. त्यामुळे त्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी विरोधी पक्षासह शिवसेना सदस्यांनी केली. प्रश्नोत्तरांनंतर शेकापचे जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. अणे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा मुद्दा मांडल्याने त्यांना या पदावरून मुक्त करण्याची मागणी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या मागणीचे समर्थन करीत महाधिवक्ता पदावर असताना, त्यांनी स्वतंत्र विदर्भाची भूमिका मांडणे योग्य नाही. अणेंच्या वक्तव्याने संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली असल्याने याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. सभापती नाईक-निंबाळकर यांनी सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)
अणेंसंदर्भातील भूमिका सरकारने स्पष्ट करावी
By admin | Published: December 15, 2015 1:42 AM