सांगली- कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार घडवल्याचा आरोप असलेले संभाजी भिडे यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून कोरेगाव-भीमामधील हिंसाचारातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. कोरेगाव भीमा दंगलीत मी उपस्थित होतो व कारणीभूत आहे, असं विधान भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांचे आरोप निराधार असून शासनाने या घटनेची म्हणजेच बनावाची पाळेमुळे शोधून चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज पत्रकाद्वारे केली आहे.
संभाजी भिडे यांनी पत्रकात म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या बीजमंत्राच्या आधारावर राष्ट्रजागृती करण्याचे काम आम्ही करतो. "कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत मी होतो व मी कारणीभूत आहे', असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेप्रमाणे गावोगावी त्यांच्या अनुयायांनी तोडफोड करून वाहने, घरे, दुकाने आणि सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस केला आहे. या सर्व गोष्टींना कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींमध्ये माझे नाव कारणीभूत असल्याचे आंबेडकर बोलले आहेत. त्यांनी निराधार आरोप करून माझ्यावर अटकेची कारवाई करून गुन्हा नोंद करून, मला याकूब मेमनची वाट दाखवावी, अशी मागणी केली आहे.
माझी शासनाला विनंती आहे की, या घटनेची म्हणजेच बनावाची खोलात जाऊन पाळेमुळे शोधून चौकशी करावी. जे अपराधी असतील त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी माझी मागणी आहे, असं पत्रकात म्हटलं आहे.