मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतक-यांची दुरावस्था झाली आहे. दूध उत्पादक शेतक-यांना तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे. या विरोधात शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे असे सांगून शेतक-यांनी दुधाची नासाडी करू नये असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.
यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाला दूध उत्पादक शेतक-यांच्या समस्यांबाबत व सरकार निर्मित संकटाला ज्या परिस्थितीत शेतकरी सामोरे जात आहेत, त्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. शेतक-यांच्या प्रश्नांबाबत सरकारची अनास्था आणि सरकारने केलेली उपेक्षा शेतक-यांच्या दुरावस्थेला कारणीभूत आहे. शेतक-यांना आंदोलन करण्याकरिता सरकारनेच भाग पाडले आहे त्यामुळे सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तात्काळ आंदोलक शेतक-यांशी चर्चा करून शेतक-यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे खा. चव्हाण म्हणाले.
दूध हा जीवनाश्यक वस्तूंमध्ये मोडणारा घटक आहे. दूध उत्पादक शेतक-यांच्या समस्यांसाठी सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा त्यात कोणताही दोष नाही. त्यामुळे शेतक-यांनी दुधाची नासाडी करू नये आणि सामान्य नागरिकांना झळ पोहोचू नये याची काळजी घ्यावी अशी विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आंदोलक शेतक-यांना केली आहे.