राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. या सरकारमधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. दुसरा मंत्रिमंडळ विस्तारदेखील लवकरच केले जाईल, असे सांगितले जात आहे. पण याच दरम्यान जनतेवर अवकाळी पावसाचे आणि पुरसदृश परिस्थितीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता तरी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ते आज सांगलीत बोलत होते.
"लवकरच गुजरात राज्याच्या निवडणुका आहेत. आम आदमी पक्ष तिथे निवडणूक लढवत आहे. आपण हिंदू देवांना मानतो हे सांगण्यासाठी कदाचित गणपती आणि लक्ष्मी देवीचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी त्यांनी केली असेल असे सांगतानाच महात्मा गांधी यांचा फोटो नोटांवर आहे त्याला जगात मान्यता आहे. आता सर्वचजण देवदेवतांचे, महापुरुषांचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी करत आहे. यामुळे कारण नसताना वाद निर्माण होईल. त्यामुळे आता जे आहे तेच सुरू असायला हवे असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
"संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. अनेक ठिकाणी शेतात पाणी साठलेले असून पीके जागीच कुजून गेली आहेत. शेतकऱ्यांची ही दिवाळी अक्षरशः अंधारात गेली. राज्यकर्त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज होती. परंतु अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, राज्यातील शेती व शेतकऱ्यांची स्थिती पाहता कृपया आपण ओला दुष्काळ जाहिर करावा. यासोबतच शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देखील देण्याबाबत सकारात्मक विचार करावा", अशी अत्यंत कळकळीची विनंती व मागणी सुप्रिया सुळे यांनीही केली आहे.