मुंबई : पालघर आणि भंडारा-गोंदियातील लोकसभा पोटनिवडणुकीत इव्हीएम मशिन बंद पडण्याचे प्रकार घडले. ईव्हीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणी मतदानाचा खोळंबा झाला. लोकांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. या सर्व घटनांमुळे लोकांच्या मनात ईव्हीएम मशिनबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपा सरकारने ईव्हीएमचा हट्ट न धरता, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुका आणि आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी मुंबईत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या वेळी अशोक चव्हाण यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, संजय निरुपम आदी नेते उपस्थित होते. पोटनिवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनमधील बिघाडाबाबत या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. भंडारा-गोंदियाप्रमाणेच पालघर लोकसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्याने अनेक ठिकाणी मतदान खोळंबले. मात्र, अशा ठिकाणी फेरमतदान घेण्यात आले नाही. पालघरमध्ये मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशिन खासगी कारमधून नेण्यात आल्या. हा गंभीर प्रकार आहे. निवडणूक आयोगाची यंत्रणा काय करतेय, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. निवडणूक निष्पक्ष आणि निर्भीड वातावरणात झाली का, याविषयी शंका आहे. काँग्रेस पक्षाचे राज्यातील नेते लवकरच दिल्लीला जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर सगळीकडे केल्याचे सर्व घटनाक्रमांवरून दिसून येत आहे, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.आगामी विधानपरिषद निवडणुकीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. बुधवारी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, तसेच शरद यादव यांच्या पक्षासमवेत चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या जागेसाठी होणारी निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यापेक्षा राज्यसभेप्रमाणे खुल्या मतदान पद्धतीने घ्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच शिवसेना-भाजपा युती न झाल्यास काँग्रेसला फायदा होईल, असे विधान केले होते. याबाबत बोलताना, चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचा विचार करण्यापेक्षा सेना-भाजपाचेच नीट पहावे, असा टोला अशोक चव्हाण यांनी हाणला.
सरकारने ईव्हीएमचा हट्ट सोडावा - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 6:20 AM