ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 2- राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार बहुमतात असल्याने मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन न घेता वटहुकूम काढावा; मात्र, या प्रश्नावर राज्यातील फडणवीस सरकार विलंब करीत असल्याचा आरोप माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी रविवारी सांगलीत केला. ओबीसी, दलित, भटके विमुक्त यांच्या आरक्षणाला धक्का लावण्यास मात्र आमचा विरोध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अॅट्रॉसिटी कायदा कुणालाही रद्द करता येणार नाही. तो संसदेने मान्य केलेला आहे. मराठा समाजाने या कायद्यात दुरुस्तीची मागणी केली आहे. त्यांनी अवश्य दुरुस्त्या सुचवाव्यात. या दुरुस्त्यांवर जाहीर चर्चा व्हावी. सरकारने या कायद्याचा दुरुपयोग करणाºयांची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणीही मुणगेकर यांनी केली. पाकिस्तानी कलाकारांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे व अभिनेता सलमान खान यांच्यातील टीका-टिप्पणीवर बोलताना मुणगेकर म्हणाले की, भारतातील मुस्लिमांनी हिंदूंना न पटणारी एखादी गोष्ट बोलून दाखविली, तर त्यांना उठसूट ‘पाकिस्तानात जा’ म्हणण्याचा अधिकार या मंडळींना कोणी दिली? या विषयावर आपण एकाच व्यासपीठावर येऊन जाहीर चर्चा करण्यास तयार आहोत, असे आव्हानही त्यांनी राज ठाकरे यांचे न घेता दिले.