राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यापैकी जवळपास २११५ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहे. यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. तर काँग्रेससोबतच शरद पवार गट आणि ठाकरे गटाची मोठी पिछेहाट झाल्याची पाहायला मिळत आहे.
ग्रामपंचायतीच्या निकलांमध्ये महायुतीने १२७७ ठिकाणी बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीला ४९७ ठिकाणी यश मिळालं आहे. तर ३४१ ठिकाणी इतरांनी बाजी मारली आहे. सदर विजयावर शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व ठिकाणी महायुतीची सरशी झाली. मी जनतेचे आभार मानतो. शासन आपल्या दारी या योजनेमुळे सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली, असं दादा भुसे यांनी सांगितले.
महायुतीच्या या विजयावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला आहे. हे महायुतीवरील मतदारांचं प्रेम आहे, मतदारांचा विश्वास आहे. मी जनतेला धन्यवाद देतो, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत, तसेच महिलांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. शासन सर्वांच्या दारी पोहोचलं आहे. आणखी जोमाने आम्ही काम करु, असं एनकाथ शिंदे म्हणाले. सर्व समाजाने आम्हाला पाठबळ दिलं, आशिर्वाद दिला. घरी बसून राज्य चालवता येत नाही, हे लोकांनी दाखवून दिलं, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.