पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरेगाव-भीमा येथे श्रद्धाळू बौद्धांवर नियोजित हल्ला झाला आहे. त्या ठिकाणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांचे धारकरी घटना घडण्याच्या ७ दिवसांपूर्वीपासून फिरत होते. एकबोटे व संभाजी भिडे यांनी कट रचला. मात्र त्यांना अटक न करता सरकारने एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून मूळ प्रकरणापासून सर्वांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्टÑीय अध्यक्ष आ़ जोगेंद्र कवाडे यांनी येथे केला.पत्रकार परिषदेत कवाडे म्हणाले, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना आजपर्यंत पकडले नाही. त्या हत्यांमध्ये कोणाचे हात आहेत, हे सरकार व तपास यंत्रणेला माहीत असूनदेखील तपास झाला नाही. तसेच कोरेगाव-भीमा प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच संभाजी भिडेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली होती. भिडे यांना वाचविण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक षड्यंत्र रचून कोरेगाव-भीमा प्रकरणात एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांना गोवण्यात येत आहे.
‘कोरेगाव-भीमा’चा हल्ला सरकार पुरस्कृत - जोगेंद्र कवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 4:57 AM